नालासोपारा : वसई-विरार शहराबाहेर जाण्यासाठी नागरिकांना ई-पास घेणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, या ई-पासचा खुलेआम काळाबाजार करून नागरिकांची लूट चालवली आहे. पाससाठी आॅनलाइन अर्ज केल्यास सतत प्रतीक्षा करा, असा मेसेज झळकतो.त्यामुळे अनेक दिवस उलटूनही हे पास नागरिकांच्या हाती पडत नाहीत. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध न होणारे ई-पास नालासोपारा येथील झेरॉक्सच्या दुकानातून मात्र १५०० रुपये मोजून मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आपल्या गावी जाता यावे यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी मुख्यालयात ई-पास आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरीला जाण्यासाठी आॅनलाइन पास काढण्याचा प्रयत्न शेकडो नागरिकांनी केला. मात्र त्यांना अॅप्रूव्हल मिळाले नाही. यू आर वेटिंगचा मेसेज त्यांना येत होता. बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा येथील कार्यकर्ते महेंद्र कदम यांनाही ई-पाससाठी पंधराशे रुपये मोजावे लागले आहेत.
कदम यांच्या आजारी वडिलांना तातडीने गावी जायचे होते. त्यासाठी त्यांनी ई-पास काढण्याचा आॅनलाइन प्रयत्न वारंवार केला. मात्र, त्यांच्या पासला अॅप्रूव्हल न येता वेटिंग असा मेसेज येत राहिला. वडिलांचे गावी जाणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे कदम यांनी एका मित्राची मदत घेतली. त्याने झेरॉक्सच्या दुकानात जा. लगेच काम होईल, असा सल्ला दिला. त्यामुळे कदम यांनी जवळील झेरॉक्सच्या दुकानात धाव घेतली असताई-पाससाठी त्यांच्याकडून पंधराशे रुपये उकळले.
जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना फोन करून माहिती दिली असून, प्रत्यक्ष जाऊन माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगणार आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार.- प्रवीण म्हाप्रळकर, तालुकाप्रमुख, शिवसेना
माहिती घेऊन चौकशी करतो. ई-पासेस आॅनलाइन मिळत असून जिल्हाधिकारी कार्यालयातूनच दिले जातात. नेमके हे ई-पास कोण बनवून देत होते याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.- किरण सुरवसे, तहसीलदार, वसई
पोलिसांना याबाबत माहिती देऊन चौकशी करायला सांगतो. हे झेरॉक्स दुकानवाले कसे पैसे व कोणासाठी घेतात याचीही चौकशी करून तथ्य आढळले तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल.- डॉ. कैलाश शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर