नालासोपारा :- सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.
ईडीने या प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या निमित्ताने ही कारवाई केली असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण आहेत प्रवीण राऊत?
प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यानं ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील ५५ लाख पुढं वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.