रेतीमाफियांविरोधात एल्गार !
By admin | Published: July 14, 2016 01:35 AM2016-07-14T01:35:17+5:302016-07-14T01:35:17+5:30
किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे
वसई : किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे. ही संघटना गेल्या दहा वर्षांपासून रेती उत्खननाविरोधात लढत असून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिने बंदी हुकुमही आणला होता. मात्र त्यानंतरही रेती उत्खनन सुरुच असल्याने गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
किल्लाबंदर-पाचूबंदर येथील किनाऱ्यावर होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाविरोधात मागील एक दशकापासून कोळी युवा शक्तीचा लढा सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, मेरी टाईम बोर्ड तसेच पर्यावरण विभागाला वांरवार पत्रव्यहाराव्दारे सूचित केल्या नंतरही येथील किनाऱ्याची होत असलेली धूप लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने जून २००६ मध्ये रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती. तरीही उत्खनन सुरूच राहिल्याने येथील कोळी समाजाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दि. १७ जून २०१० रोजी भार्इंदर पुलाच्या पश्चिमेस अनधिकृत रेती उत्खनन करण्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला. मात्र आजही या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून सुमारे ५० च्यावर पडाव दररोज दिवस-रात्र रेती उत्खनन करीत आहेत. यामुळे संपूर्ण किनाऱ्याची वाताहत झाली असून अनेक घरे समुद्राने गिळंकृत केली आहेत. गेल्यावर्षी खोल समुद्रात ओएनजीसी या कंपनीने तेल संशोधन सुरू केल्यामुळे मागील एक वर्षांपासून मासेमारीचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच याठिकाणच्या किनाऱ्यावर मत्स्य प्रजननाच्या काळातही दिवस-रात्र होत असलेल्या रेती उत्खननामुळे खाडीत पूर्वी मिळणाऱ्या बोय, कोळंबी, खेकडे तसेच इतर मत्स्यप्रजातींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तसेच सुरुंच्या बागेतील झाडे जमिनीची धूप झाल्याने वाहून जात आहेत. शिवाय रेती उत्खनन करणाऱ्या अनेक पडावावर रजिस्टे्रशन क्रमांकच नाही आणि ही बाब सागरी सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे. मात्र याबाबत वसईच्या तहसीलदाराना प्रत्यक्ष भेटून व निवेदनाव्दारे कळवूनही कारवाई करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याबाबत गेल्याच आठवड्यात संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे कार्याध्यक्ष मिल्टन सौदीया यांच्या नेतृत्वाखाली सुनिल दरपाळकर, प्रेम जान, नितीन बाठ्या, जोनास खांडळ्या, संजय मानकर यांनी वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांची भेट असता एक धक्कादाक बाब उघडकीस आली. पाचूबंदर किनाऱ्यावर होत असलेल्या रेती उपसाबाबत विविध वर्तमानपत्रात फोटोसहित बऱ्याच वेळा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी जाधव यांनी पाचूबंदर किनाऱ्यावर रेती उपसाच होत नसल्याचा अजब अहवाल दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कोळी युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना चांगलेच धारेवर धरले व प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता या ठिकाणच्या किनाऱ्याची वाट लावणाऱ्या वाळू माफियावर तातडीने कारवाई न केल्यास कोळी युवा शक्तीच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर समस्त कोळी बांधव धडक मोर्चा नेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी दिला आहे.