कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेले १० तास उपाशीपोटी, सफाळे आरोग्य केंद्रामधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 09:25 AM2021-01-23T09:25:35+5:302021-01-23T09:31:17+5:30
राज्यात लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम राबविला जात असून लोकांना स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा दिली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सफाळे : प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबकल्याण नियोजनासाठी घेतलेल्या शिबिरासाठी ५३ महिला आणि त्यांच्या लहान मुलांना सकाळपासून उपाशीपोटी तब्बल १० तास रखडवून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर कडक कारवाईची मागणी सफाळेवासीयांनी केली आहे.
राज्यात लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम राबविला जात असून लोकांना स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा दिली जाते. यावेळी केंद्रामार्फत गर्भनिरोधक गोळ्या व निरोधचे वाटप करण्यासोबतच तांबी बसवण्याची सुविधाही या केंद्रामार्फत पुरविण्यात येते, तर काही संस्थांद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सेवाही दिली जाते. त्या अनुषंगाने सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कुटुंब कल्याण कार्यक्रमांचे आयोजन करून ५३ महिलांना बोलाविण्यात आले होते. सकाळी कडाक्याच्या थंडीत दारशेत, सोनावे आदी भागातून सर्व महिला आपल्या लहान बालकांना घेऊन सफाळे केंद्रात उपस्थित राहिल्या होत्या. दरम्यान, लहान बालके आणि त्यांच्या मातांना १० तास उपाशी ठेवण्यात आल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश घरत यांना कळल्यावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
मी गरीबांना सेवा देत असतो. त्यामुळे काही कारणास्तव उशीर होत असतो.
- डॉ. राजेंद्र चव्हाण
कुटुंबकल्याण नियोजनादरम्यान झालेल्या प्रकरणाची सर्व माहिती घेतो.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी,
जिल्हा आरोग्य अधिकारी.