पालघर : पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ माजली आहे, मात्र जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाकडून माहिती आधीच लीक झाल्याचा फायदा उचलत अनेक पोल्ट्रीधारक, दुकानदारांनी सोमवारीच आपल्या कोंबड्या, अंडी सुरक्षित ठिकाणी हलविल्याने बर्ड फ्लूचा प्रसार जिल्ह्यात वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
परिसरातील १९ पोल्ट्री फार्म आणि शेकडो दुकानांतील कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत कांबळे यांच्या जलद प्रतिसाद दलामार्फत हाती घेतली जाणार होती, मात्र या कारवाईची माहिती लीक झाल्याने काही पोल्ट्रीधारक आणि दुकानदारांनी आपल्याजवळील सर्व माल आधीच इतरत्र हलविल्याने बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गटाच्या पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे ५० कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. हा बर्ड फ्लूचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त झाल्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाली आणि मृत पक्ष्यांचे अवशेष तपासणीसाठी पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले. पालघरमधील सूर्या कॉलनीमध्ये असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली.
अचानक कोंबड्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याने या पोल्ट्री फॉर्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तो सील करण्यात आला. या पोल्ट्री फॉर्ममध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश निषिद्ध केला. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पुणे येथे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मात्र अहवाल लीक झाल्याने पोल्ट्रीधारकांनी त्यांच्याकडील कोंबड्या रातोरात अन्यत्र हलवल्या असून या कोंबड्यांची विक्री झाली तर जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.