मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:51 PM2019-05-20T23:51:44+5:302019-05-20T23:51:58+5:30

६१ दिवसांच्या कालावधीचे परिपत्रक : यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी, मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच

Fierce festivities with fishing ban | मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

मासेमारीबंदीच्या फतव्याने तीव्र नाराजी

Next

- हितेन नाईक


पालघर : १५ मे ते १५ आॅगस्ट अशी ९१ दिवसांची मासेमारी बंदी कालावधीची मच्छिमारांची मागणी धुडकावून लावीत मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै अशी केवळ ६१ दिवसाच्या मासेमारी बंदी कालावधीचे परिपत्रक काढल्याने मच्छिमारामधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.


जिल्ह्यातील वसई तालुक्यातील वसई, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव तर पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबे, डहाणू तालुक्यातील डहाणू, धाकटी डहाणू, झाई-बोर्डी या भागातील बाराशे ते पंधराशे मच्छिमार बोटीद्वारे पापलेट, दाढा, घोळ, शेवंड, बोंबील आदी माश्यांची मासेमारी केली जात असून दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होत आहे. पापलेट, दाढा, घोळ, बोंबील, शेवंड आदी मच्छिमाराना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मत्स्यसंपदा नामशेष होतात की काय अशी अवस्था निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था आणि त्यांच्या संघटनांनी १५ मे ते १५ आॅगस्ट अशी ९१ दिवसाची मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर करण्याची मागणी शासन दरबारी अनेक वर्षापासून केली आहे. समुद्रात माश्यांनी टाकलेल्या अंड्यातून निघालेल्या लहान पिल्लाची होणारी मासेमारी (कत्तल) थांबून मत्स्य उत्पादनात वाढ व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र या मागणीचा कुठलाही सकारात्मक विचार न करता शासनाने पुन्हा १ जून ते ३१ जुलै असा अवघ्या ६१ दिवसाची बंदी घोषित करून मत्स्यदुष्काळाला जणू आमंत्रणच दिल्याची भावना मच्छिमारामधून व्यक्त केली जात आहे.


पालघर जिल्ह्यातील हजारो बोटधारक खरेतर १ मेपासूनच मासेमारी बंदी कालावधीची अंमलबजावणी करण्याची तयारी करीत आपल्या बोटी स्वत:हून किनाºयावर नांगरून ठेवण्याचे काम हाती घेतात. सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थानी मागील १२-१५ वर्षापूर्वी १५ मेपासूनच आपल्या सुमारे ४५० बोटींची मासेमारी उत्स्फूर्तपणे बंद करून रत्नागिरी ते गुजरात दरम्यानच्या सहकारी संस्थांना भेट देत मे महिन्यापासून मासेमारी बंदीबाबत जनजागृती सुरू केली होती. त्याची अंमलबजावणी आताही सुरूच असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. मच्छिमाराकडून मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात असताना काही मत्स्यव्यवसाय अधिकारी शासनाची दिशाभूल करून १ जून ते ३१ जुलै अशी मर्यादित मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले.

१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी, डोलारा कोसळतोय
मासळीच्या साठ्यांचे जतन तसेच मच्छिमारांच्या जीवित वा वित्त यांचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ च्या अधिकारान्वये १ जून ते ३१ जुलै या कालावधीसाठी समुद्रात यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे.
जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रि येला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते. तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागर किनाºयापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल. मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छिमार सहकारी संस्थांच्या मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Fierce festivities with fishing ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.