धीरज परब / मीरारोड - वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छिमार बोट मंगळवारी रात्री बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी अशी 10 जणं पोहून नजिकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. बोट किनाऱ्यापासून जवळ बुडाल्याने जीवितहानी टळली. बुडालेली बोट स्थानिक मच्छिमारांनी दोन बोटींच्या सहाय्याने ओढत चौक धक्क्याजवळ आणली.
उत्तनच्या नवीखाडी येथील डिक्सन डिमेकर यांची ब्लेसिंग ही मच्छिमार बोट सोमवारी ( 18 सप्टेंबर )मासेमारी साठी समुद्रात गेली होती. डिक्सनसह भाऊ निलेश आणि 8 खलाशी बोटीवर होते. परंतु काल मंगळवारी( 19 सप्टेंबर ) हवामान खात्यापाठोपाठ मत्स्यव्यवसाय विभागाने समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देत मच्छिमारांना पुढील 24 तास समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला. त्यामुळे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या बोटी माघारी परतू लागल्या.
काल मंगळवारी डिमेकर यांची ब्लेसिंग बोटदेखील परतीच्या वाटेला लागली. रात्री चौक धक्क्याला येत असताना किनाऱ्यापासून अर्धा किमी अंतरावर खवळलेल्या समुद्रात वाळूच्या बेटाला लागून बोट उलटली. बोट बुडताच बोटीवरील नाखवा व खलाशांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. नजीकच्या बॅबिलोन व मुक्तीदाता या वसईच्या मच्छीमार बोटींना गाठत स्वतः चा जीव वाचवला.
आज बुधवारी सकाळी उत्तन, चौक, पाली भागातील मच्छीमारांनी चौक धक्क्याकडे धाव घेतली. बोटीवरील नाखवा व खलाशी सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. बुडालेल्या बोटीचा शोध मच्छिमारांनी लावला असून ती समुद्रात वाळूत उपडी होऊन रुतून बसली होती. पाऊस, वादळीवारे आणि समुद्र खवळलेला असूनही मच्छीमारांनी मोठ्या हिमतीने बुडालेली बोट काढण्याचे प्रयत्न सुरु केले . दोन बोटींच्या सहाय्याने दोरखंडाने बांधून बुडालेली बोट चौक धक्क्याजवळ आणण्यात मच्छिमारांना यश आले .
'लोकमत'ने सकाळीच बोट बुडाल्याची बातमी दिल्यानंतर संबंधित सरकारी यंत्रणांनी घटनेची माहिती घेतली . पोलीस उपअधीक्षक नरसिंह भोसले , नायब तहसीलदार पंढरीनाथ भोईर, सहाय्यक निरीक्षक प्रवीण साळुंके, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, मॅल्कम कासुघर आदी उपस्थित होते .
हवामान खात्यासह मत्स्य व्यवसाय विभागाने मंगळवारीच वादळीवारा व मुसळधार पावसाची माहिती देत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला. पण जे आधीच समुद्रात गेले होते त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ? असा सवाल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी केलाय.
आधीच कल्पना असती तर मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले नसते. डिमेकर यांच्या बोटीला अपघात होऊन असा जीवघेणा प्रसंग टळला असता. डिमेकर सह अन्य मासेमारी बोटींना परत फिरावे लागले. त्यामळे डिमेकर सह अन्य मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.