आॅपरेशन मुस्कानमध्ये पाच मुलांची सुटका
By admin | Published: July 30, 2016 04:38 AM2016-07-30T04:38:11+5:302016-07-30T04:38:11+5:30
वसई पोलिसांच्या आॅपरेशन मुस्कानच्या शोधमोहिमेमध्ये एकूण पाच अल्पवयीन मुले आढळून आली. त्यातील तीन मुले दिल्लीहून घर सोडून पळून आल्याचे उजेडात आले असून दोन
वसई : वसई पोलिसांच्या आॅपरेशन मुस्कानच्या शोधमोहिमेमध्ये एकूण पाच अल्पवयीन मुले आढळून आली. त्यातील तीन मुले दिल्लीहून घर सोडून पळून आल्याचे उजेडात आले असून दोन मुलांच्या नातेवाइकांचा अद्याप पत्ता मिळालेला नाही.
वसई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने शुक्रवारी दुपारी आॅपरेशन मुस्कान हाती घेतले होते. या वेळी रेल्वे परिसरात बेवारस फिरत असलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला. या मोहिमेत वसई रेल्वे स्टेशनवर दोन अल्पवयीन मुले आढळून आली. त्यांना आपल्या आईवडील अथवा नातेवाइकांसंबधी माहिती देता आली नाही. विष्णू राजू (१३) आणि सागर शंकर (१२) अशी मुलांची नावे आहेत. चौकशीनंतर त्यांना बालगृहात पाठवण्यात येणार आहे. विरार रेल्वे स्टेशनवर दिल्लीहून घरातून पळून आलेली तीन मुले पोलिसांच्या हाती लागली. दिल्लीतील संगम विहार परिसरात राहणारे राजू सिंंग (१३), ओम जोशी (१२) आणि कृष्णा पासवान (१५) गुरुवारी घरातून पळून गेले होती. मुंबईकडे जाणारी फिरोजपूर जनता एक्स्प्रेस गाडी पकडून निघालेली ही तीन मुले विरारला उतरली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीतील त्यांच्या पालकांशी संपर्क साधून माहिती दिली. उद्या शनिवारपर्यंत तीनही मुलांचे पालक वसईमध्ये येणार असून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक एम.आय. पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक रणजित शिरसाठ यांनी दिली. (प्रतिनिधी)