पालघर : फ्लेमिंगो हे पक्षीप्रेमींचे खास आकर्षण. खांजण जागेबरोबरच विस्तृत तळ्यामध्येही हे पक्षी पहावयास मिळतात.फ्लेमिंगो हा विदेशी पक्षी असून पावसाळ्याच्या सुमारास दरवर्षी केळवे व परिसरातील खांजण भागात आपले भक्ष शोधत येतात. या वर्षीसुद्धा फ्लेमिंगो केळवा येथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. केळवा परीसरातील खांजण भागात छोटे मासे, खेकडे व जलचर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने फ्लेमिंगो दरवर्षी या परिसरात येतात.उंच मान, टोकदार चोच, लांबलचक पाय, पंखावर लाल काळ्या रंगाची छटा असलेल्या या सुंदर पक्षाला रोहित नावानेही संबोधले जाते. थव्याथव्याने भक्ष शोधत येणाऱ्या या पक्ष्यांचा थवा बघण्यास मिळणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो व पक्षीप्रेमी पावसाळ्याच्या वेळेस हे दृष्य पाहण्यासाठी आतुर असतात. दुर्बिणीच्या सहाय्याने ते त्यांच्या हालचाली तासनतास पाहतात. दोन वर्षापूर्वी केळव्याजवळील दांडी-खराळी गावात फ्लेमिंगो पक्षाची शिकार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत कलम लावून कारवाई केली गेली होती. शिकार झाल्यामुळे फ्लेमिंगो येतात की नाही अशी धास्ती होती. परंतु त्यांचे आगमन झाल्याने ती निराधार ठरली.(वार्ताहर)>...तरीही आलेत भरभरून पक्षी!फ्लेमिंगोच्या शिकारीमुळे पक्षी व निसर्गप्रेमी मात्र नाराज झाले होते. सुंदर फ्लेमिंगो पक्ष्याच्या झालेल्या शिकार प्रकरणामुळे अनेकांना हुरहूर लागून गेली व अशा या निंदनीय प्रकारामुळे विदेशातून येणारे हे पाहुणे कायमचे तर आपले येणे बंद करणार नाही ना अशी अनेकांच्या मनात भीती दाटली असतानाच केळवा येथे यावर्षी पुन्हा परदेशी पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे पक्षीप्रेमींमघ्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
केळव्यात यंदाही आले फ्लेमिंगोंचे थवे
By admin | Published: August 01, 2016 3:02 AM