‘सफेद जांबू’ या परदेशी फळझाडाची वाढती क्रेझ; मुंबई बाजारात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:14 PM2021-04-24T23:14:15+5:302021-04-24T23:14:25+5:30
उत्पन्नात वाढ
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : विसाव्या शतकाच्या प्रारंभी डहाणू तालुक्यातील घोलवड गावात राहणाऱ्या पारसी कुटुंबीयांनी सफेद जांबू या परदेशी फळझाडाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड त्यांच्या बागायतीत केली होती. घोलवड गावच्या टोकेपाडा येथील शेतकरी विनेश खोत यांचे पंजोबा सोमला रामा खोत यांनी १९४५ ते ५० सालाच्या दरम्यान पारसी व्यक्तींकडून टोकेपाडा येथील जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फळे देणारी सफेद जांबूची पाच-सहा झाडे होती.
या फळांची चव आवडल्याने आणि उत्पादनही चांगले येऊ लागल्याने खोत यांनी काही रोपांची लागवड केली. याच काळात घोलवड, बोर्डी आणि डहाणूतील विविध भागात स्थानिक शेतकऱ्यांनी लावलेली झाडे जोमाने वाढली होती. विनेश यांचे आजोबा गोवन आणि वडील बंडू यांनीही या झाडांच्या लागवडीत भर घातली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विनेश यांच्याकडे दीडशेहून अधिक लागवड आहे.
मुख्य म्हणजे या झाडाची लागवड आंतरपीक म्हणून चिकू, नारळ यांच्या फळबागेत केली जाते. या पिकाला मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी काळी सुपीक जमीन आणि दमट हवामान पोषक आहे. विशेषत: किनाऱ्यालगत या झाडाची वाढ जोमाने होऊन लागवडीपासून चौथ्या वर्षी फलधारणा होते.
डहाणू तालुक्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील विविध भागात या पिकाचे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वी केवळ सफेद रंगात उपलब्ध असणारे हे फळ आज लाल, हिरवे, फिके व गडद गुलाबी या रंगात उपलब्ध झाले आहे. कमी उत्पादन खर्चात भरघोस पीक हे या पिकाचे खास वैशिष्ट्य आहे.
केवळ या झाडांचीच बागायती करायची झाल्यास, दोन झाडांमध्ये दहा फुटांच्या अंतरातही पीक चांगले येत असल्याने कमी जागेत जास्त झाडे लावून अधिक उत्पादन घेता येते. पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून किमान दीड हजाराचे उत्पन्न मिळते. तालुक्यात या झाडाची लागवड दोनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. डिसेंबर ते मे हा या फळांचा हंगाम असतो. या काळात तीन वेळा बहार येतो. अति थंडी व उष्णतेमुळे फळगळती होते. अवकाळी पाऊस, वादळ इ. नुकसानीचा सामना करावा लागतो.