दिवाळीचा आनंद मावळताच ‘ते’ रोजगाराच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:25 AM2017-11-08T01:25:35+5:302017-11-08T01:25:35+5:30
स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी, वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसो दूरच आहे.
मोखाडा : स्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी, वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसो दूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षनुवर्षे स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहे.
दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कोणतीही यंत्रणा येथे उपलब्ध नाही, तसेच केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाही.
तालुक्यातील बिवलपाडा, रुईपाडा, फनसपाडा, कुर्लोद, सावर्डे, कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया म्हणजे काय रे भाऊ असाच काहीसा सवाल येथील आदिवासी करत आहेत. तर शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लपंडाव असून त्यातच सततचे भारनियमन व वाढीव बील आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रुग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत असून यामुळे बोगस डॉक्टरांना पेव फुटले असून सगळ्या सोईयुक्त दवाखाना अद्यापही मोखाडयात झालेला नाही यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक, मुबंई, ठाण्याकडे धाव घ्यावी लागते.