डहाणू/बोर्डी - तालुक्यातील आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते. शुक्रवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संतोष कडू यांना हरणटोळीचा वावर लक्षात आला.
संतोष यांना घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सर्वत्र हरणटोळी जातीच्या सर्वाची छोटी पिल्लं आढळली. हे पाहून ते सावध झाले, त्यांनी लक्षपूर्वक निरीक्षण केल्यावर मादा थोड्याथोड्या अंतराने पिलांना जन्म देत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. हा प्रकार घरमालकाने वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेला कळविला. त्यानंतर सर्पमित्र रेमंड डिसोझा घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी मादी पिल्लांना जन्म देत असल्याचे पाहिले. मादा सर्पाची ही क्रिया पूर्ण झाल्यावर नवजात तेवीस पिल्लांना एका भांड्यात गोळा करुन सुमारे साडेतीनफूट लांब मादीला पकडण्यात आले.
दरम्यान, प्राणीमित्र आणि वन कर्मचाऱ्यांनी चरिकोटबी येथील जंगलात या मादा आणि तिच्या पिलांना सोडून दिले आहे. एखाद्या रहिवासी घरात सापाला इतकी पिल्लं देताना पाहणे हा पहिलाच आणि अविस्मरणीय अनुभव असल्याची माहिती प्राणीमित्र रेमंड डिसोझा यांनी दिली. यापूर्वी नागरिक घराच्या आवारात सर्प दिसल्यावर, त्याला ठार मारायचे. मात्र, प्राणीमित्र संघटनेकडून मागील दशक भरापासून सुरू असलेल्या जनजागृतीचे, हे फलित असून त्यामुळेच कडू कुटुंबीयांच्या सहकार्याने हे सर्प सुरक्षित राहू शकले, असे रेमंड यांनी लोकमतशी बोलताना म्हटले.