येथे गुन्ह्याऐवजी दिला जातो मिसिंग दाखला; कमी गुन्हे दिसण्यासाठी तुळींज पोलिसांची शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:17 PM2019-10-31T23:17:08+5:302019-10-31T23:17:51+5:30
मोबाइल पळवला तरी गुन्हा नाही
मंगेश कराळे
नालासोपारा : रोजच्या रोज दाखल होणारे गुन्हे कमी दाखवण्यासाठी नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. मॉर्निंग वॉक, कामावर जाताना, वाहनातून तसेच रस्त्याने चालत असताना चोरट्याने मोबाइल पळवला नेला तर गुन्हा दाखल न करता प्रॉपर्टी मिसिंग दाखला देऊन फिर्यादीची बोळवण केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जर कोणाचा मोबाइल खेचून नेला तर कायद्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतांना तक्रारदाराला गुन्हा दाखल होत नसल्याचे कारण देत मिसिंग दाखला दिला जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नालासोपारा शहराची दोन पोलीस ठाण्यामध्ये विभागणी करून पश्चिमेसाठी नालासोपारा तर पूर्वेसाठी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, तुटपुंज्या पोलीस बळावर तुळींज पोलिसांच्या हद्दीमधील गुन्हेगारीचा ग्राफ दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून त्यावर अंकुश लावण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहे.
२०१९ वर्षात तुळींज पोलीस ठाण्यात ३० आॅक्टोबर पर्यंत १२२४ गुन्हे दाखल झाले आहेत. हा आकडा वाढू नये म्हणून अनेक महिन्यांपासून गुन्हा न दाखल करता तुळींज पोलीस बिनधास्तपणे फिर्यादीना मिसिंग दाखला देत आहेत. काही कामचुकार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून दाखला देत असल्याचेही बोलले जात आहे.
बुधवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेचा मोबाइल चोरट्याने पळवला. त्या महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पण, गुन्हा दाखल होणार नाही असे सांगत संबंधित महिलेला मिसिंग दाखला दिला आहे. पूर्वेकडील परिसरात दिवसाला अंदाजे असे दोन ते तीन प्रकार घडत असून यावर अंकुश बसवण्यात पोलीस अपयशी होत असताना गुन्हे सुद्धा दाखल होत नसल्याने नागरिकांमध्ये याची चर्चा सुरू आहे. लवकरच काही त्रस्त नागरिक पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची भेट घेणार असल्याचेही कळते.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांना विचारले असता, काही अधिकारी तसेच कर्मचारी असे काही प्रकार करत असल्याने त्यांना सक्त ताकीद दिली आहे. पुन्हा असे काही निदर्शनास आल्यावर संबंधित अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.
तुळींज पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ : तुळींज पोलीस ठाण्यात २ पोलीस निरीक्षक, ७ सहायक पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरीक्षक आणि १३० पोलीस कर्मचारी असे एकूण मनुष्यबळ आहे. तर बिट मार्शल योजनेअंतर्गत ३ बिट मार्शल पोलीस तुळींज पोलीस ठाण्याच्या ताफ्यात आहे.
माझ पत्नी मार्केटमध्ये गेली असता, तिथेच तिचा मोबाइल चोरट्याने पळवला. ती पोलीस ठाण्यात गेल्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी मोबाइल कुठेतरी पडून गहाळ झाल्याचा प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला देण्यात आला होता. - गौरव मानालाल जैन, फिर्यादी
विरारमध्येही असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी विरार पोलीस ठाण्यात दाखल होणाºया गुन्ह्यांची संख्या गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांपेक्षा कमी असल्याने पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना संशय आल्याने विरारच्या पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांना प्रॉपर्टी मिसिंगचे दप्तर चेक करायला सांगितले होते तसेच गुन्ह्यांची व्यविस्थत माहिती घेण्याचेही आदेश दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.