मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्फे विरार बोळींज येथे उभारण्यात आलेल्या ५४४६ सदनिकांच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला वसई-विरार महानगरपालिकेतर्फे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे सोडतीमधील यशस्वी व पात्र अर्जदारांना सदनिकांचा ताबा देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
येत्या आठ दिवसांत सदर सोडतीमधील यशस्वी व पात्र अर्जदारांना देकारपत्र देण्यात येईल. पात्र अर्जदारांनी एक्सिस बँकेतून देकारपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी केले आहे. पात्र अर्जदारांनी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत अदा केल्यास त्यांना त्वरित सदनिकेचा ताबा देखील देण्यात येईल, असे श्री. लहाने यांनी सांगितले.
सदर प्रकल्पाअंतर्गत टप्पा १ व टप्पा २ मध्ये ५० इमारतींमधील ५४४६ सदनिकांची सन २०१४ व सन २०१६ मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली. २२ ते २४ मजल्याच्या असणाऱ्या या सर्व इमारतींचे बांधकाम मार्च - २०१७ मध्ये पूर्ण झाले. तथापि बहुमजली इमारतीसाठी आवश्यक असलेली अग्निशमन शिडी वसई-विरार महानगरपालिकेकडे नसल्याने सदर शिडी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.या अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिका, म्हाडा व संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्यात झालेल्या बैठकीत अग्निशमन शिडीच्या किंमतीपोटी "म्हाडा"ने वसई विरार महानगरपालिकेला २०.४५ कोटी रुपये (वीस पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये) एवढी रक्कम अदा केली आहे. तसेच अग्निशमन केंद्राची उभारणीही करून दिली आहे. "म्हाडा"चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. सदर प्रकल्पाअंतर्गत तीन टप्प्यात दहा हजार परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत.