शशी करपे वसई : ग्रामीण भागातील वाढीव घरपट्टी मागे घेण्यात यावी यासाठी सर्वपक्षीयांचे जबाब दो आंदोलन सुरु असून प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सर्वपक्षीयांनी आता आयुक्त चलो जाव आंदोलनाची घोषणा केली आहे. तर महापौरांनी यातून मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीयांशी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात घरपट्टी वाढीचा निर्णय घेतल्याने घरपट्टीत दुपटीने वाढ झाली आहे. त्याविरोधात जनआंदोलन समितीने सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून जबाब दो आंदोलन सुरु केले आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामीण भागातील वार्डात जाऊ़न चौकसभा घेत आहेत. त्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयासमोर जाऊन जबाब दो चा नारा देत आहेत. यावेळी नगरसेवक लोकांपुढे येऊ़न आपली बाजू मांडत आहेत. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक लॉरेल डायस वगळता सर्वच नगरसेवकांनी घरपट्टी वाढीला विरोध असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांना लोकांच्या भावना कळवण्यात आल्या आहेत. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर अद्याप ठाम आहे. गावात मात्र महापालिकेकडून अद्याप नोटीसा आणि जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल या भितीपोटी गोडीगुलाबीने घरपट्टी वसुली करण्याचे धोरण महापालिकेकडून अवलंबवण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने जनआंदोलन समितीने सर्वपक्षीयांच्या मदतीने आयुक्त चलो जाव आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिली. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ता नर, कॅथॉलिक बँकेचे चेअरमन ओनिल अल्मेडा, माजी नगरसेविका बीना फुर्ट्याडो, जिल्हाध्यक्ष पुष्कराज वर्तक यांनी महापौरांची भेट घेतली.
करवाढ मागे घेण्यासाठी वाढता दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:36 AM