लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या सोमनाथ (गीर) येथील रहिवासी भूपतभाई जीवा भाई (वय ५२) या मच्छिमाराचा ९ ऑक्टोबरला मृत्यू झाला. गुजरात राज्यातील ट्रॉलरमधून मासेमारी करताना भारताची समुद्र हद्द ओलांडल्याने पाकिस्तान सैनिकांनी त्याला अटक केली होती. भूपतभाई याचा मृतदेह एक महिन्यानंतर मायदेशात पाठविला जाणार आहे.
अरबी समुद्रात मासेमारी करताना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केलेल्या आणि अनेक वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय मच्छिमारांपैकी काही मच्छिमारांची पाकिस्तान सरकारने टप्प्याटप्प्याने सुटका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही शेकडो भारतीय मच्छिमार, खलाशी पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यातील काही लोकांच्या शिक्षेचा कालावधीही पूर्ण झाला तरी त्यांना सोडण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यापूर्वी जगदीश मंगल (वय ३५) या मच्छिमाराचा ६ ऑगस्टला मृत्यू झाला होता. तोही गुजरात राज्यातील होता. त्यांचे पार्थिव ४० दिवसांनी परत आणले गेले. भूपतभाई यांचे पार्थिव लवकरच परत आणले जाईल, असा विश्वास त्यांच्या नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे.
२६४ जण तुरुंगातआजमितीस २६४ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. २५० हून अधिक भारतीय मच्छिमारांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली असून, त्यांचे राष्ट्रीयत्वही निश्चित झाले आहे. या मच्छिमारांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी केली आहे.
पाकिस्तान सरकार २ जुलैला १०० भारतीय मच्छिमारांना सोडणार होते; परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांनी त्यांची सुटका केली नाही. भारतानेही ७४ पाकिस्तानी मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. या मच्छिमारांनी अनावधानाने समुद्रातील सीमा ओलांडून पलीकडच्या देशाच्या सीमेत प्रवेश केल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक करू नये. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या देशाच्या सीमेत परत पाठवावे. - जतीन देसाई, माजी सचिव, इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस ॲण्ड डेमॉक्रॅसी संस्था