शाईची बाधा झाल्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची बोटे सुजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:33 PM2019-04-30T23:33:03+5:302019-04-30T23:34:14+5:30
पालघर लोकसभा निवडणूक सोमवारी शांततेत सर्वत्र पार पडली पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना शाईची बाधा झाल्याने बोटे सुजल्याचा प्रकार घडला आहे.
नालासोपारा - पालघरलोकसभा निवडणूक सोमवारी शांततेत सर्वत्र पार पडली पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना शाईची बाधा झाल्याने बोटे सुजल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे मतदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या शाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसईच्या मतदान केंद्रातील महिला कर्मचाऱ्याला शाईची बाधा झाल्याने बोटे सुजल्यावर डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करण्यात आले आहे.
मतदान करण्यासाठी मतदारांच्या डाव्या बोटाला निळीकाळ्या रंगाची शाई लावण्यात येते. ही शाई मतदारांच्या बोटाला लावण्यासाठी एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. पण या शाईची बाधा काही कर्मचाऱ्यांना झाली असल्याची बाब पुढे आली आहे. वसईमधील नाझरेथ शाळेच्या मतदान केंद्रावर मतदारांना शाई लावण्यासाठी दीपाली बागुल या महिला कर्मचारीची नियुक्ती केली होती. त्यांच्या बोटाला ही शाई लागल्याने वेदना होत झोबूं लागल्याने बोटे सुजली. पण मतदान केंद्र सोडता येत नसल्यामुळे मतदान संपल्यावर डॉक्टरांकडे धाव घेतली. ह्या शाईची ऍलर्जी झाल्यामुळे बोटे सुजल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून दीपाली यांना औषधे आणि इंजेक्शन दिले. असाच तक्रारी घेऊन चार ते पाच जण आले असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
शाई खराब असल्याची किंवा कोणाची बोटे सुजल्याची एकही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही तरी पण मी बघतो नेमके काय प्रकार आहे तो - डॉ. दीपक क्षीरसागर (वसई प्रांताधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी, मतदार संघ वसई, 133)
शाई ज्या बाटतील होती ती छोटी आणि निमुळती होती. त्यामुळे त्यातून शाई काढून लावताना हाताला लागत होती. शाईमुळे हाताची बोटे सुजली आणि कमालीची झोंबू लागली होती. शाई निघू नये म्हणून ती अधिक तीव्र रसायनांनी बनवली जात असेल. मात्र त्याचा थेट हाताशी संपर्क येत असल्याने या शाईची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. - दीपाली बागुल (बाधा झालेल्या महिला कर्मचारी)