अनिरु द्ध पाटील/हुसेन मेनन/शुभदा सासवडे/सुरेश काटे, पालघरनव्या पालघर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या एकजुटीचा अभूतपूर्व आविष्कार रविवारी निघालेल्या मोर्चाद्वारे घडून आला. त्याचा आनंद प्रत्येक मोर्चेकराच्या चेहऱ्यावर दिसत होता. आयोजकांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.मच्छीमार, आगरी, शिलोत्री, आदिवासी, आदी समाजांचे प्राबल्य असणाऱ्या या जिल्ह्यात मराठ्यांची संख्या आहे तरी किती व हाक दिली तर ते कसे आणि ते किती एकवटतात, याचा प्रत्यय आजवर कधी आला नव्हता. तो या मोर्चामुळे घडून आला. निधीपासून ते पार सामग्रीपर्यंत कुठेही, कशाचीही कमी पडू नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. वॉकीटॉकीधारी ३० स्वयंसेवक, स्वच्छता राखणारे युवक, युवती यांच्या ४०० स्वयंसेवकांचे पथक, ४ ड्रोनद्वारे थेट प्रक्षेपण व छायाचित्रण, पाणी, खाद्यपदार्थ यांचे वाटप करणारे असंख्य स्वयंसेवक यांनी मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी लावलेले स्टॉल, प्रत्येक मोर्चेकऱ्याने सोबत आणलेली पिशवी, त्यातच कचरा टाकून ती कचराकुंडीत टाकणे, मोर्चा पुढे जाताना त्या कचराकुंड्या रिकाम्या करून पुढच्या भागात ठेवणे, गोळा झालेला कचरा पालिकेच्या घंटागाडीत टाकणे, या बाबीमुळे कुठेही अस्वच्छता किंवा गोंधळ, गैरसोय नव्हता. मोर्चाने रस्त्यालगत डाव्या बाजूचा भाग मोकळा ठेवल्याने वाहतूकही सुरळीत होती, हे विशेष.छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊमाता यांची वेशभूषा केलेली अनेक बालके, मुली मोर्चात सहभागी झाल्या होत्या. चार महिन्यांच्या लेकीला घेऊन रणरणत्या उन्हात सहभागी झालेले मोर्चेकरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.सर पाणी हवे, दादा बिस्कीट घ्याना, ताई पोळी भाजी घ्या ना, असे कार्यकर्ते आपणहून मोर्चेकऱ्यांना विचारत होते. त्यामुळे मोर्चेकऱ्यांत समाधान होते. दुतर्फा असलेली अनेक दुकाने चालू होती.राज्यकर्त्यांनो समाजहित साधा अन्यथा, जागा दाखवू !1आर्यन हायस्कूलच्या मैदानात मराठा क्र ांती मूक मोर्चातील मोर्चेकरी जमले होते. या वेळी शिवाजी महाराजांना अभिवादन करून कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा समाजातील मुलींनी भाषणाच्या माध्यमातून विविध मुद्दे व समस्या मांडल्या. मराठा समाजातील राज्यकर्त्यांनो समाजहित साधा अन्यथा, जागा दाखवून देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कायदे मंडळाने कायद्यात सुधारणा करावे असे मत नेहाने व्यक्त केले. मराठा जात नव्हे, अंगार आहे अशी गर्जना करून मराठ्यांना जागृत राहण्याची गरज डहाणूतील दृष्टी देशमुख हिने व्यक्त केली. बघा आमची ऐकी, जिजाऊंच्या लेकी म्हणत मराठ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम देण्यात आला. 2कोपर्डी घटनेचा निषेध विशिष्ट जातील नव्हे, तर गुन्हेगारीला आहे. तर निर्दोषांना न्याय देण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा हटविण्याची गरज बोईसरच्या शिवानी देशमुखने मांडली. मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी आरक्षणाच्या अभावी शैक्षणिक संधीच्या लाभाला मुकत आहेत. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत आरक्षण न दिल्यास हक्कासाठी आगामी काळात जिजाऊंच्या लेकी हाती शस्त्र घेतील, असे वसईकर वर्षा सावंत म्हणाली. अपेक्षित बदल न झाल्यास भविष्यातील मोर्चे मूक नसतील हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेण्याचे सूचक विधान जुही चव्हाण हिने केले.3शेतकऱ्यांना हमीभाव, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, मुली व महिलांना न्याय आणि निर्दोष समाजबांधवांना अॅट्रॉसिटी कायद्यापासून संरक्षण आवश्यक असल्याच्या मुद्यांना पालघरच्या ऐश्वर्याने हात घातला. मराठ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढणाऱ्यांनो आम्हाला षंढ समजू नये, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या माध्यमातून दिलेली निवेदने, पत्रिका नाहीत. 4हा मोर्चा वादळाच्या रु पाने राज्याच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनजीक पोहोचला आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाजाचे मोर्चे गांभीर्याने घेतले पाहिजेत, याची पुनरावृत्ती करण्यात येत होती. विक्र मगडच्या आरती यादव या चिमुकलीने केलेल्या भाषणातून एकांकिका वा एकपात्री नाटकाची झलक दिसून आली. तिने अभिनयातून उपस्थितांचा स्वाभिमान जागृत केल्याने गर्जनांनी मैदान दुमदुमले. सातच्या आत घरात ही परिस्थिती बदलण्याची अपेक्षा बोईसरच्या धनश्री पाटीलने मांडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास जाहीर निवेदनाचे वाचन आणि राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला.
पालघरात मराठ्यांच्या एकजुटीचा अपूर्व अविष्कार
By admin | Published: October 24, 2016 1:59 AM