जिल्ह्यात श्रमजीवीचे आंदोलन; पंचनाम्यात प्रलंबित दावेधारकांसही समाविष्ट करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 10:59 PM2019-11-01T22:59:44+5:302019-11-01T23:00:04+5:30
परतीच्या पावसाने वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
पालघर : परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खावटीचे धान्यही वाया गेले आहे. नुकसानीचे पंचनामे करताना जिल्हा प्रशासनाने वनपट्टे धारक तसेच प्रलंबित दावे धारकासही पंचनाम्यात सामावून घ्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली.
परतीच्या पावसाने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पालघर, ठाणे, रायगड, आणि नाशिक येथील सर्व तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. परतीच्या पावसाने आपल्या जिल्ह्यातील शेतकरी अल्प भूधारक वनपट्टेधारक आणि प्रलंबित दावेदारांच्या भातपिकाचे भरमसाठ नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन असलेली शेती आणि त्या अनुषंगाने वर्षभरात साठवून ठेवले जात असलेल्या खावटी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयाच्या हातून भात पिकच गेल्याने त्यांना शासनाने रेशन धान्य दुकानातून ३५ किलो धान्य विनामूल्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच २०१७-१८ वर्षामधील बाधित शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणीही यावेळी उपस्थित आ. श्रीनिवास वनगा यांनी केली. शासन पातळीवरून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नियुक्त कृषीसेवक, तलाठी, ग्रामसेवक आदींच्या टीम गावातील ग्रामपंचायतीमध्ये बसून वरवरचे पंचनामे करीत असल्याची तक्रार श्रमजीवी तालुकाध्यक्ष दिनेश पवार यांनी केले. त्यामुळे प्रत्येक गावात येणाºया अधिकाºयांच्या टीमने तारीख देऊन मगच पंचनामे करण्यास यावे, असे सुचविले. यावेळी तहसीलदार संदीप शिंदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, वनविभागाचे सानप, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती, नायब तहसीलदार दीपक गडग आदींशी आ. वनगा, सेना तालुकाध्यक्ष विकास मोरे, सुरेश रेंजड आदीनी चर्चा केली.
पंचनामे करून बाधितांना भरपाई मिळावी
जव्हार : यावर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी करून टाकली आहे. सततच्या पावसामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवीच्या वतीने शुक्रवारी जव्हार तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. शेतकºयांनी कापून टाकलेल्या भात, वरई या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात, नागली, वरई ही पिके तयार आहेत. मात्र नोव्हेंबर महिना लागला तरीही पाऊस रोजच संध्याकाळी हजेरी लावत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शेकडो एकर पिके कापून टाकलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पंचनामे करण्याचे काम संथगतीने
वाडा : परतीच्या पावसाने वाडा तालुक्यातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जगण्याचे एकमेव साधन फक्त शेती असल्याने वर्षभराच्या खावटीचे नुकसान झाले आहे. शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे करण्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर करून शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवीने मोर्चा दरम्यान केली. तालुक्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्रमजीवीतर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केले.