मजूर महिलाही साधतात मोबाइलवरून संवाद
By admin | Published: January 18, 2016 01:51 AM2016-01-18T01:51:23+5:302016-01-18T01:51:23+5:30
विक्रमगड तालुका हा अदिवासी भाग असून खेड्यापाड्यांत विखुरलेला आहे़ येथे शेतीव्यतिरिक्त अन्य दुसरे रोजगार देणारे मुख्य साधन नाही.
तलवाडा : विक्रमगड तालुका हा अदिवासी भाग असून खेड्यापाड्यांत विखुरलेला आहे़ येथे शेतीव्यतिरिक्त अन्य दुसरे रोजगार देणारे मुख्य साधन नाही. त्यामुळे उर्वरित शेती हंगाम सोडला तर मजुरीशिवाय पर्याय नाही़ मात्र, या भागातील खेड्यापाड्यांतील मजूर आदिवासी अशिक्षित महिलांनाही संपर्क, संवादाची साधने खेड्यापाड्यांत उपलब्ध झाल्याने घराबाहेर, शेतावर, बाजारात काम करणाऱ्या स्त्रियांनीही आता मोबाइल संवाद सुरु केल्याने अच्छे दिनचा अनुभव येत आहे़
सध्याचे युग हे आधुनिक युग असल्याने काही आधुनिक गोष्टी वापराकरिता फारशा ज्ञानाची आवश्यकता लागत नाही. त्यातील एक मोबाइल हे साधन स्वस्त व वापरण्यास सोपे असल्याने शेतावर, घराबाहेर काम करताना सेल फोन जवळ असल्याने पती, मुलगा, आई, वडील, नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याशी थेट संवाद साधता येत असल्याचे येथील सारशी, तलवाडा येथील खेड्यांवर राहणारी महिला बायती सावजी भावर या रानभाजी विकणाऱ्या व रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेने सांगितले़ तर, दुसरीकडे तू कुठे आहेस, तू कशी आहेस, काम आटोपले का, असा संवाद माझा नवरा मोबाइलवर सतत साधत असतो़ त्यामुळे आमचे भावनिक नाते अधिक सुरक्षित, अधिक घट्ट असल्याचे सविता कासट यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़
आम्ही शेतावर किंवा बाहेर काम करीत असतो़ कधीकधी शहरात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते़ सासू, सासरे, मुले शिक्षणासाठी घरी असतात. त्यांची खुशाली, आजारपण याची माहितीदेखील क्षणाक्षणाला आम्हाला या मोबाइलमुळे मिळते़ आम्ही लांब असलो तरी आमच्या कुटुंबाला सुरक्षित वाटते़ या अगोदर आम्ही बाहेर असल्याने आमच्या गावाकडील कुटुंबाची काळजी वाटत होती. परंतु, आमच्याकडे मोबाइल असल्याने अधिक सुरक्षित आणि काळजीमुक्त झाल्याचे सुधा कोरडा या स्थलांतरित महिलेने सांगितले़ मोबाइल हा आमच्या कुटुंबाचा आधार झाला असून आदिवासींच्या झोपडीत एक क्रांती झाल्याचे अनेक महिलांनी आपले मत मांडले. संपर्काचे उत्तम साधन मिळाल्याने तोट्यापेक्षा फायदाच झाल्याचे समाधान अनेक आदिवासी महिलांनी व्यक्त केले़.