विक्रमगडच्या पूनमने दिले शेकडो सर्पांना जीवदान
By admin | Published: July 28, 2016 03:33 AM2016-07-28T03:33:05+5:302016-07-28T03:33:05+5:30
साप नुसता दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. इवलेसे पिलू जरी निघाले तरी सर्व जण घराबाहेर धावत सुटतात. पण, विक्र मगड येथे राहणारी तरुणी पूनम कुरकुटे
- राहुल वाडेकर, विक्रमगड
साप नुसता दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. इवलेसे पिलू जरी निघाले तरी सर्व जण घराबाहेर धावत सुटतात. पण, विक्र मगड येथे राहणारी तरुणी पूनम कुरकुटे या एका सर्पमैत्रिणीने मानवी वस्तीतून तब्बल २०० ते २५० साप पकडून त्यांना जंगलात सुरक्षितस्थळी सोडून जीवदान दिले आहे. ती वयाच्या १८ व्या वर्षांपासून सर्पसंवर्धनाचे काम करते.
तरु ण सर्पमित्र होण्याचा तिने मान मिळवला आहे. २२ वर्षांची पूनम आता वाणिज्य शाखेतून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असली तरी तिने साप पकडण्याचे वाइल्ड लाइफ असोसिएशन या संस्थेकडून शिक्षण घेतले आहे. ही संस्था बऱ्याच वर्षांपासून सर्पसंवर्धनाचे काम करते. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सापांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे सापांशी दोस्ती करणारी पूनम सक्रिय झाली आहे. तिने विषारी, बिनविषारी एकूण २०० ते २५० साप पकडून विक्रमगड परिसरातील जंगलात सोडून त्या सापांना जीवदान दिले आहे.
भारनियमनाच्या काळात तिने खेडोपाडी जाऊन मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मण्यार, घोणस, नाग असे जहाल विषारी साप पकडले. विशेष म्हणजे तिला एकदाही सर्पदंश झाला नाही. साप आढळल्यास लोक तिला आवर्जून फोन करतात. मानवी वस्तीत निघणारा साप हा विषारी असो किंवा बिनविषारी, भीतीपोटी सापाला संपवतात. अन्नसाखळीतील सापांना जीवदान मिळावे, यासाठी पूनमने हे कार्य हाती घेतले आहे.
दीक्षित सरांची १७ वर्षांची सर्पसेवा
सापांविषयी असलेल्या गैरसमजामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्यात येते. वास्तविक, साप हा पर्यावरणचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सर्वांनी नागपंचमीला साप वाचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन विक्रमगड येथील सर्पमित्र गोपाळ दीक्षित (सर) यांनी केले आहे.
सर्पमित्र गोपाळ दीक्षित सर विक्र मगड हायस्कूल येथे १९९७ पासून कार्यरत आहे. गेल्या १७ वर्षांपासून विक्रमगडमध्ये सर्पमित्र म्हणून कार्यरत असून या कार्याची दखल घेऊन वन विभाग, महाराष्ट्र शासनाकडून सर्पमित्र म्हणून ओळखपत्र मिळालेले विक्र मगड तालुक्यातील पहिले सर्पमित्र आहेत.
अनेक संस्थांच्या मदतीने पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये सहभाग त्यांनी घेतला आहे. विक्र मगड, वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात येथे वन विभागाच्या साहाय्याने वन्यजीव संवर्धनामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. आतापर्यंत त्यांनी १११० साप पकडून वनामध्ये मुक्त केले.