तोरंगणघाटात लुटालुटीला ऊत
By admin | Published: July 26, 2016 03:04 AM2016-07-26T03:04:51+5:302016-07-26T03:04:51+5:30
मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा
विक्रमगड : मोखाडा तालुक्यातील तोरंगणघाटामध्ये वळणावर एका बाजूने चढाव व दुसऱ्या बाजूने उतार असल्याने त्या दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा वेग आपोआप कमी करावा लागतो़ तसेच या दरम्यान पाच ते दहा किलो मीटरपर्यंत घनदाट जंगल व आजूबाजू कोणातीही वस्ती अगर घरे नाहीत़ याच संधीचा फायदा घेत आठ दहा जणांची टोळी वाहनांवर दगडफेक करून अथवा ते थांबवून रात्री लुटमार करीत आहे.
या टोळीमध्ये दोन तीन महिलांचा समावेश आहे. गाडीला हात करुन थांबविण्याचा प्रयत्न केला जातो़ गाडी थांबली तर लूट करण्याचा त्याचा इरादा असतो,जर गाडी थांबली नाही तर गाडीवर चालकाच्या दिशेने जोराने दगडफेक केली जाते़ त्यामध्ये जर वाहनचालकास दगड लागला तर अपघात घडून गाडी थांबल्यास लूट केली जाते़ हा प्रकार सर्रास चालू असतांनाही प्रशासनाकडून मात्र सुरक्षतेसाठी काहीच उपाय योजना नाही़ हा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर,जव्हार,विक्रमगड असा असून सध्या रात्री या मार्गावरुन येणे धोक्याचे बनले आहे़ त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे़
दरम्यानच्या विक्रमगड येथील राहाणारे रविंद्र तुकाराम आयरे व त्यांचे कुंटुंबीय,मित्रमंडळी यांसह नाशिकहून विक्रमगड येथे येत असतांना रात्री ११ वाजताचे सुमारास त्यांचेकडील एर्टीगा तोरंगणघाटामध्ये वळणावर आली असता रस्त्याच्या उजव्या बाजूकडून आठ ते दहा लोकांची टोळी त्यामध्ये दोन तीन महिला दिसत होत्या. त्यामधील दोन तरुण व्यक्ती गाडी थांबविण्याकरीता हात देत गाडी थांबवा गाडी थांबवा याप्रमाणे गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत होते़ परंतु या ठिकाणी असे प्रकार घडत असल्याची जाणीव रविंद्र आयरे यांना असल्याने त्यांनी गाडी न थांबविता गाडीचा वेग वाढविला व कसेबसे वळण कापले़ गाडी थांबली जात नाही हे पाहून या सर्व लोकांनी कारच्या दिशेने दगडफेक केली. यात काही दुर्दैवी घटना घडली नसली तरी असे प्रकार वाढलेले असून या भागात पोलिसांची गस्त तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. या दगडफेकीनंतर रवींद्र आयरे हे जवळच असलेल्या मोखाडा पोलीस चौकीत गेले असतांना तेथे कुणीही हजर नव्हते. (वार्ताहर)
काल आम्ही प्रवास करीत असतांना तोरंगणघाटामध्ये प्रथमच
असा प्रकार पाहीला व खूप भयभीत झालो़ आमच्या गाडीवर जोराने दगडफेक करुन हल्ला करण्यात आला,मात्र काचा बंद असल्याने हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही़ मात्र या भागत पोलिसांनी जास्त लक्ष घालून गस्त वाढविण्याची गरज आहे़ कारण ही आठ ते दहा जनांची टोळी येथे सक्रीय असून लुटण्याकरिता ती एखाद्याचा जीव घेऊ शकते़
- संदेश राऊत, विक्रमगड