Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:23 AM2024-11-23T09:23:42+5:302024-11-23T09:24:07+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ज्या नालासोपाऱ्यात बविआने राडा केला, तेथील उमेदवार क्षितिज नाईक पिछाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, मतदानाच्या एक दिवस आधी नालासोपारा-विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला होता. त्याच नालासोपारा मतदारसंघात मोठा उलटफेर होताना पाहायला मिळत आहे. स्थानिक आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलांमधून समोर येत आहे. तर भाजपा उमेदवार राजन नाईक आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
Maharashtra Election Results 2024 :
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी नालासोपारा-विरार येथे बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हॉटेल विवांता येथे विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईक यांची बैठक सुरू होती. तितक्यात तिथे बविआचे कार्यकर्ते पोहोचले आणि विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा मोठा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर हे पोहोचले. एका बॅगेतून काही डायऱ्या आणि त्यातील तपशील मीडियासमोर खुले करत ती बॅग विनोद तावडे यांची असल्याचा दावाही केला. विनोद तावडे यांना घेराव घालून तिथेच अडकवून ठेवले. त्यानंतर लगेचच हितेंद्र ठाकूर तेथे पोहोचले. तब्बल चार तासांनी विनोद तावडे हितेंद्र ठाकूर यांच्याच कारमध्ये बसून तिथून रवाना झाले. यानंतर यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.
क्षितिज ठाकूर पिछाडीवर तर राजन नाईक आघाडीवर
यानंतर आता त्याच मतदारसंघाचे उमेदवार असणारे क्षितिज ठाकूर पिछाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. तर, ज्या राजन नाईक यांना त्या हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली, तेच राजन नाईक आघाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलांनुसार दिसत आहे. तर वसईतून हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपली आघाडी कायम राखली आहे, असे सुरुवातीला हाती आलेल्या कलांमधून पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आमच्या जागांबाबत आम्हाला खात्री आहे. आमच्या जागा निवडून आल्यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सत्ता समीकरणे सुरूच राहणार. जोपर्यंत राजकारण सुरू आहे, तोपर्यंत या सगळ्या बाबी होतच राहणार, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.