वसई : महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली.
वसई मतदारसंघात सांडोर गावच्या हद्दीत मतदानकेंद्र क्र. ११६ या नेट्रोडेम इंग्लिश स्कूल मध्ये खोली क्र .१ आणि या शाळेच्या संपूर्ण परिसरात हा आकर्षक ‘सखी बूथ’ तयार करण्यात आला. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी इथे अधिकाधिक आकर्षक फुलांची सजावट, रांगोळी काढून स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आल्याची माहिती वसई विधानसभेचे सहा.निवडणूक अधिकारी तथा वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
सखी मतदार केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी हे सर्व महिलाच असतात. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक, कर्मचारी यांचा समावेश असतो. त्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी असते.