मिरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटींचा पगार झाला दुप्पट
By Admin | Published: February 16, 2016 01:49 AM2016-02-16T01:49:26+5:302016-02-16T01:49:26+5:30
श्रमजीवी कामगार संघटनेने मिरा-भाईंदर महापालिकेतील २६०० सफाई कामगारांच्या न्याय्य हक्काची लढाई जिंकली असून कामगारांना शासनाच्या २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसुचनेनुसार मा
उसगांव : श्रमजीवी कामगार संघटनेने मिरा-भाईंदर महापालिकेतील २६०० सफाई कामगारांच्या न्याय्य हक्काची लढाई जिंकली असून कामगारांना शासनाच्या २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसुचनेनुसार माहे जानेवारीपासून च्या फरकाच्या रकमेसह यापुढे सफाई कामगारांना किमानवेतन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसे लेखी पत्र श्रमजीवी कामगार संघटनेला दिले आहे.
आता कामगारांना यापुढे दरमहिना रू. ७०००/-च्या ऐवजी रू. १४०००/-किमान वेतन मिळणार आहे. हे श्रमजीवी सफाई कामगारांच्या किमानवेतनासाठीच्या न्याय्य हक्क आंदोलनामधे संघटनेचे अभुतपूर्व यश असल्याचे सांगून संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी बेमुदत संप मागे घेत असल्याचे जाहिर केले व कामगाराना या सत्याग्रह आंदोलनातील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रमजीवी कामगार संघटना गेले वर्षभर महापालिकेतील सफाई कामगारांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली २३ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यावर सफाई आंदोलन करण्याकरीता गेले होते. त्यावेळी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री हे स्वत: नगरविकासमंत्री असल्याने त्यांच्यासमवेत चर्चा करून संबंधितांना आदेश देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही.
त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१५ रोजी मीरा-भाईंदर महापालिकेत निर्धार सत्याग्रह करत आपली मागणी लाऊन धरली होती. तेव्हाही आयुक्तांनी दोन महिन्यांची मुदत मागीतली होती. ते आश्वासन देखील पूर्ण न झाल्याने ३ फेब्रुवारी २०१६ रोजी किमानवेतनाच्या हक्कासाठी मीरा-भाईंदर महापालिकेतील २६०० कंत्राटी सफाई कामगारांनी एक दिवसाचे लाक्षणिक संप आंदोलन करून कामगारांना किमानवेतन मिळत नाही याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून १० फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.