मीरा रोड, दि.20 - मीरा रोड परिसरातही मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भार्इंदरमधल्या सखल भागात पाणी साचले. येथील स्थानिकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरले. तर 10 ठिकाणी मोठी झाडं पडल्याच्या घटना घडल्या. तर दोन ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले तर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.मंगळवारपासून वादळीवा-यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. सोसाट्याच्या वा-यामुळे रात्री जेसल पार्क मधील आशीर्वाद रुग्णालयाजवळील रस्त्यावर मोठे झाड एका कारवर कोसळले. कारचे नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या शिवाय भार्इंदर पोलीस ठाण्यामागील कस्तुरी रुग्णालयाजवळ, शांती गार्डन परिसरातही झाडं पडली. सर्वात जास्त झाडं उत्तन भागात पडली. डोंगरी खदानीजवळ मोठं झाड मध्यरात्री रस्त्यातच पडल्याने वाहतूक बंद झाली. या शिवाय लाईट हाऊस, केशवसृष्टी, धावगी, भुतबंगला, करईपाडा भागात झाडं पडली. वृक्ष प्राधिकरण व अग्निशमन दलाने पडलेली झाडं हटवली आहेत.मंगळवारी सायंकाळपासून तर पावसाने जोर धरल्याने शहरात जागोजागी पाणी साचले. लोकांच्या घरांमध्ये तसेच दुकान आदींमध्ये पाणी शिरले. मीरारोडच्या सिल्वर सरितामध्ये जास्त पाणी शिरल्याने अग्निशमन दलाचे जवान तैनात होते. रात्री व आज सकाळीदेखील घर - दुकानांमध्ये साचलेले पाणी उपसण्यासह नागरिकांची साफसफाई चालली होती.हाटकेश भागात इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये रात्री पाणी शिरले असताना रिलायन्स एनर्जीला वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सातत्याने नागरिकांसह पालिका कर्मचा-यांनी फोन करुनदेखील कुणी आले नाही. तर डेल्टा गार्डन व भार्इंदरच्या रावल नगरमध्ये शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. पाणी साचल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर अधेमधे वीज पुरवठादेखील खंडीत होत होता.सर्वत्र साचलेले पाण्याचा निचरा होण्यास पालिकेने बांधलेल्या नाल्यांची पातळी योग्य नसल्याने अनेक ठिकाणी पंप लाऊनसुद्धा पाणी कमी होत नव्हते. रात्र भर ज्या भागात पाणी साचले तेथील नागरिकांचे अतोनात हाल झाले.
मीरा-भार्इंदरमध्ये घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, वीजेचाही खेळखंडोबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 6:15 PM