अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त घोर हा नृत्योत्सव धनत्रयोदशी ते बलिप्रतिदा या काळात साजरा केला जातो. येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात या नृत्योत्सवाला मानाचे स्थान आहे. यंदा प्रथमच मुंबईत हे नृत्य सादर केले गेले. त्याला शहरी नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
घोर हे पारंपरिक वाद्य असून लोखंडी सळईच्या रिंगणात घुंगरू गुंफून निर्मिलेले वाद्य हाताच्या मुठीत घेऊन वाजविले जाते. हा पुरुषप्रधान समूह नाचाचा प्रकार असून जोडीदाराच्या सहाय्याने घोरीच्या तालावर दोन ते तीन पद्धतीने फेर धरून नाच केला जातो. डोक्यावर फेटा, अंगात बनियन घातल्यानंतर छातीवर लुगड्यांच्या सहाय्याने नक्षीदार विणकाम करून त्यावर झेंडू फुलांच्या माळा तसेच कमरेला घुंगरांच्या सहाय्याने पुरु षाला सजवले जाते. तर डोळ्यात काजळ घातल्याने त्यांच्या सौंदर्यात भरच पडते. एका हातात दांडिया आणि दुसऱ्या हातात मोरपीसांचा गुच्छ असतो, त्यांना घोरया म्हणतात. १६ वर्षांपासूनचे युवक यात सहभागी होतात. यासाठी शिक्षण, नोकरी सांभाळून गणेशोत्सव संपल्यानंतर ते दिवाळीपर्यंत रात्रीच्या काळात सराव करतात. तर बगळी (८ ते १० फुट उंच बांबूच्या टोकावर कापडाने बनवलेली बगळ्यांची जोडी) मध्यभागी धरली जाते. कवया (गायक) पारंपरिक गाण्याच्या सुरावटीवर हा नाच केला जातो. हे कवया गणपती, राम-कृष्ण आणि ग्रामदैवतांची स्तुतीपर कवने गातो. पारतंत्र्यकाळात इंग्रजी राजवटी विरूद्ध स्वकीयांना लढण्यास प्रोत्साहित करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही कवया शाहिरांची भूमिका बजावत होते.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीच्या दिवशी मंडली मातेच्या (सरस्वती देवीच्या) विधिवत पूजेने घोर नृत्योत्सवाला प्रारंभ झाला आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेला रात्री घोर नृत्योत्सवाची सांगता होते. सीमा भागातील डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि आगर या गावांमध्ये हा पारंपरिक नृत्यप्रकार आजही आपली सुवर्ण परंपरा टिकवून आहे. गावतील बाबुराव जोंधळेकर, संदेश गोंधलेकर हे कवये पंचक्र ोशीत प्रसिद्ध आहेत.ज्येष्ठांकडून मिळणारे मार्गदर्शन, त्यात कालानुरूप होणारे बदल आणि नवीन पिढीची ही सांस्कृतिक परंपरा जपण्याची जिद्द यामुळेच हा उत्सव आजही तेवढ्याच उत्साहात साजरा होतो. यावर्षी पहिल्यांदाच मुंबईत हा नाच सादर केल्यावर शहरी लोकांची दाद मिळाली. तारपा नृत्या प्रमाणे राजाश्रय मिळाल्यास त्याचा प्रचार-प्रसार होईल. - संदेश गोंधळेकर(कवया, चिखले माच्छी समाज घोर मंडळ)