थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या वसईकरांना मनपाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:46 AM2021-01-20T09:46:08+5:302021-01-20T09:47:45+5:30

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची ...

Municipal Corporation slaps Vasaikars for not filling up water bill | थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या वसईकरांना मनपाचा दणका

थकीत पाणीपट्टी न भरणाऱ्या वसईकरांना मनपाचा दणका

googlenewsNext

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेल्या व्यापारी परवाना नूतनीकरण कराचे प्रकरण ताजे असताना आता शहरातील ज्या नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरणा केली नाही, त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी अदा न केलेल्या २०० हून अधिक नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही पालिका हद्दीत सुरूच आहे, तर बहुतेक नागरिकांचे उद्योगधंदे, व्यवसाय आणि नोकऱ्याही सुटल्या आहेत. अशा वातावरणात विविध प्रकारच्या कर आकारणीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रातील नळजोडणीधारकांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागील थकबाकीचा भरणा केलेला नाही, अशा नळजोडणीधारकांकडून मागील पाणीपट्टी कराची थकबाकी वसूल करण्याच्या अनुषंगाने नळजोडणी खंडित करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली आहे. 

या तोडू कारवाईअंतर्गत खंडित करण्यात येणारी नळजोडणी पाणीपट्टीची थकीत रक्कम भरणा केल्यानंतर पुन्हा वितरण वाहिनीवर जोडण्यासाठी रु. २५००/- प्रति जोडणी अशी आकारणी करण्यात येईल, असा फतवादेखील महापालिका प्रशासनाने काढला होता. या नोटिसीमध्ये थकीत पाणीपट्टीधारकांनी पाणीपट्टी कराची थकबाकी रक्कम आपल्या नजीकच्या महानगरपालिका कार्यालयात भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार महापालिकेच्या पाणीपट्टी विभागामार्फत पाणीपट्टी थकबाकीधारकांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात येत आहेत. या कारवाईत आतापर्यंत २०० हून अधिक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, असे पाणी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

नागरिक गेले १० महिने घरीच आहेत, लोकल ट्रेन सुरू झाल्या नाहीत, नागरिकांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही, अशा परिस्थितीत नळ जोडण्या खंडित केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोरोनाकाळात कारवाई अयोग्य
वसई-विरार महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र उमेदवारीची चर्चा रंगत आहे, अशा वातावरणात नळ जोडण्या खंडित करण्याचा विषय तापणार असून विविध पक्ष महापालिकेच्या या धडक कारवाईबाबत आक्षेप घेत, कोरोनाकाळात अशा प्रकारची कारवाई योग्य नसल्याचे पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत. 

Web Title: Municipal Corporation slaps Vasaikars for not filling up water bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.