बविआच्या ९ नगरसेवकांना नोटीस
By admin | Published: February 9, 2016 02:19 AM2016-02-09T02:19:48+5:302016-02-09T02:19:48+5:30
विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळू नये यासाठी बहुजन विकास आघाडीतून फुटून नऊ नगरसेवकांनी वसई विरार शहर विकास आघाडी स्थापन केल्याविरोधात शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे
वसई: विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळू नये यासाठी बहुजन विकास आघाडीतून फुटून नऊ नगरसेवकांनी वसई विरार शहर विकास आघाडी स्थापन केल्याविरोधात शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी नऊ नगरसेवकांना १७ फेब्रुवारीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०७ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने पाच जागा जिंकल्या होत्या. शिवसेना सभागृहात मोठा विरोधी पक्ष बनल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे.
ही संधी शिवसेनेला मिळू नये यासाठी बहुजन विकास आघाडीने राजकीय खेळी खेळली होती. त्यानुसार आघाडीतून महेश पाटील, रिटा सरवैय्या, सखाराम महाडीक, माया चौधरी, अतुल साळुंखे, नरेंद्र पाटील, सदानंद पाटील, विनय पाटील, प्रशांत राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर या नऊ नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वसई विरार शहर विकास आघाडी नावाने स्वतंत्र गट स्थापन केला होता. पालिकेत शिवसेनेपेक्षा मोठा गट तयार झाल्याने या गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे पालिकेला अद्यापही विरोधी पक्षनेता मिळालेला नाही.
बहुजन विकास आघाडीने आमची पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्याची कायदेशीर पूर्तता करण्यात आली आहे. सभागृहात आता आमचा गट सर्वात मोठा असल्याने विरोधी पक्षनेतेपद आमच्या गटालाच मिळणार आहे. आमच्या गटनेत्याने माझ्या नावाची शिफारस करून तशी मागणी केलेली आहे.
- महेश पाटील, नगरसेवक