भेंडीचा पाड्याची पाण्याची समस्या सुटली; राेजगारासाठी स्थलांतर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:22 AM2021-01-24T00:22:44+5:302021-01-24T00:22:54+5:30
भेंडीचा पाडा या गावातील बहुसंख्य व्यक्ती या तालुक्यातील क्रशरवर काम करतात, तर उर्वरित कुटुंबे दिवाळीनंतर उपजीविकेसाठी स्थलांतर करतात
मोखाडा : जिल्ह्याच्या टोकाला वसलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील मोखाडा तालुक्यातील मोखाडा-खोडाळा रस्त्यावर वसलेले भेंडीचा पाडा येथील पाणी आणि राेजगाराची समस्या दूर झाली आहे. सुमिटोमो केमिकल प्रा.लि. आणि लायन्स क्लब ऑफ तारापूर यांनी पाण्याची व्यवस्था करून रोजगारनिर्मितीसाठी रोपेवाटप करून विविध प्रकल्प सुरू केले आहेत.
भेंडीचा पाडा या गावातील बहुसंख्य व्यक्ती या तालुक्यातील क्रशरवर काम करतात, तर उर्वरित कुटुंबे दिवाळीनंतर उपजीविकेसाठी स्थलांतर करतात. पिण्याच्या पाण्याची विहीर मार्चनंतर आटते. त्यामुळे या कालावधीनंतर पाण्यासाठी दीड किमी अंतरावर जाऊन नदीतून पाणी आणावे लागते. अखेर लायन्स क्लबतर्फे ७.५ एचपी पम्पाच्या साह्याने गावात पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पाणी कनेक्शन करून दिले आहे. यासाठी दीड किमी लांबीची पाइपलाइन (एचडीपीएई) टाकली आहे, तसेच आवश्यकतेनुसार शेतकरी व गावात वापरासाठी कनेक्शन काढून देण्यात आले आहेत. तसेच घरगुती वापरासाठी दहा हजार लीटर क्षमतेचे पाच हौद, पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लीटर क्षमतेची टाकी व ऑस्ट्रेलियन बनावटीचा अल्ट्रा फिल्टरेशन टेक्निकचा फिल्टर बसविला आहे.
ग्रामस्थांचे श्रमदान
प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी विनामोबदला सोलार पॅनल, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व हौद, टॉयलेट यासाठी जागा दिली आहे, तसेच पाइपलाइनचा चर करणे व पसरवणे, विविध प्रकारचे बांधकाम, सोलार पॅनल उभारणी, यासाठी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले आहे.
शेतीसाठी स्वतंत्र पाच हजार लीटरची टाकी
शेतीसाठी स्वतंत्र पाच हजार लीटर क्षमतेची टाकी व कनेक्शन दिले आहेत. पाड्याच्या दोन्ही वेशींवर ग्रामस्थांनी सुचविल्यानुसार दोन टॉयलेट ब्लॉक बनविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या निवडीप्रमाणे मोगरा, पपई यांची रोपे वाटप केली. गावात आठ साेलार पथदिवे बसवले आहेत.