पालघर : २७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतून पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गावासह अन्य १८ गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको ने मागितलेल्या २ दलघमी पाण्याच्या मागणीला पालघर नगरपरिषदेने तीव्र विरोध दर्शविला.पालघर २७ गावे नळपाणी पुरवठा योजना वर्ष २०११ साली सुरू असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे सध्या ही योजना पालघर नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. या योजनेचा देखभाल दुरु स्तीचा खर्च नगर परिषद करीत असून या योजनेतील अनेक गावे पाणी घेऊनही अपुरा आणि दर ८ ते १५ दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे कारण देत बिल भरीत नाहीत. त्यामुळे याचा मोठा त्रास नगरपरिषदेला सोसावा लागत आहे.पालघर नगरपरिषदेच्या ११ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या योजनेतून दररोज २ दलघमी पाण्याच्या मागणीसाठी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी प्रथम २७ गावे योजनेतील लोकांची पाण्याची गरज भागवा नंतर सिडको चा विचार करा असे सांगून उपस्थित नगरसेवकांनी सिडको ला पाणी देण्यास आपला विरोध दर्शविला. शहरातील प्रत्येक व्यक्तीला दरडोई ७० लिटर पाण्याची आवश्यकता असताना त्यांना कमी पाण्याचा पुरवठा केला जातो. पालघर नगरपरिषदेला प्रत्यक्षात १० दलघमी पाणी मिळणे अपेक्षित असताना त्याना ४ दलघमी इतके कमी पाणी मिळते.२०१३ च्या लोकसंख्येच्या आधारावर मिळणारा अपेक्षित पाण्याचा साठा पाहता आजच तेवढी (सुमारे दीड लाख) लोकसंख्या वाढल्याने या वाढलेल्या लोकांना पिण्याचे पाणी द्यायचे कुठून? असा प्रश्न नगर पालिका प्रशासना पुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन पिण्याच्या पाण्याची लाईन मिळावी यासाठी अनेक घरांचे अर्ज आजही नगरपरिषद कार्यालयात पडून असून लोकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिका क्षेत्रातील अल्याळी च्या भोईर पाडा, बेंदर पाडा या भागाला एप्रिल,मे महिन्यात टँकरने पाणी पोचिवण्याची आफत सध्या स्थानिक नगरसेवक प्रितम राऊत यांच्यावर आली होती. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची भासणारी निकड कशी पूर्ण करावी ही नगरपालिकेच्या समोरची डोखेदुखी वाढत आहे.या बाबत ११ जुलै रोजी च्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षानीं हा विषय स्थगित ठेवला असून वरिष्ठ पातळी वरून सिडको ला पाणी देण्या बाबत दबाव वाढत असून २ जुलै रोजी होणाºया सभेत नगरसेवक दबावाला बळी पडतात की दबाव झुगारून लावतात, हे पहावयास मिळणार आहे. पालघर नगरपरिषदेच्या सिडकोला पाणी देण्यावरुन केलेल्या विरोधाला २० वर्षांपासून उच्च न्यायालायत संघर्ष करणाºया माजी आमदार नवनीत शहा यांनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी येथील लोकप्रतिनिधी व आमदार खासदारांबाबत नाराजी व्यक्त केली.ही गावे बिल भरत नाहीत२७ गाव योजनेतून सातपाटी, शिरगाव, अंबाडी, पडघे, नंडोरे, बिरवाडी, कमारे, माहीम आदी १५ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. त्यातील सातपाटी, शिरगाव आदी फक्त ५ गावे आपली बील भरतात.बाकीची गावे पाण्याचे बील, विद्युत देयके भरत नसल्याने नगरपालिकेला अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. अशा गावांना सुमारे ६ दलघमी पाण्याचे वितरण होते.पालघर नगरपालिका क्षेत्रातील गावनाच पुरेसे पाणी मिळत नसताना सिडको ला २ दलघमी बाबी देणे शक्य नसल्याने सध्यातरी कोणत्याही परिस्थितीत सिडको ला पाणी द्यायचे नाही अशी भूमिका नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, गटनेते मकरंद पाटील, प्रितम राऊत आदीं नगरसेवकांनी घेऊन सभेत जोरदार विरोध केला आहे.
सिडकोच्या पाण्याच्या मागणीला विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 4:27 AM