पापडखिंडच्या पाण्याची चोरी, टँकरद्वारे खुलेआम पाण्याचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:33 AM2018-01-09T02:33:55+5:302018-01-09T02:34:05+5:30
महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभरातच आटण्याच्या मार्गावर आहे.
- शशी करपे
वसई : महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभरातच आटण्याच्या मार्गावर आहे.
विरार येथे एक एमएलडी क्षमतेचे पापडखिंड धरण आहे. छटपूजा, गुरे-ढोरे धुणे, आत्महत्या याप्रकारांमुळे धरण वादात सापडले असतानाच आता धरणाला लागून असलेल्या खाजगी जागेत दहा ते पंधरा बोअरवेल मारून एका दादाने प्रचंड पाणी उपसा सुुरु केला आहे. या बोअरवेलने पाणी उपसून एका मोठ्या हौदात साठवले जाते. त्या हौदातून टँकरमध्ये भरून विरार परिसरात पाणी विकले जात आहे. याठिकाणी दिवस रात्र बोअरिंगव्दारे पाणी उपसा सुुरु असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच धरण आटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईत भर पडण्याची भिती व्यक्त करण्यात येते.
धरणाच्या सुरक्षेसाठी आळीपाळीने दोन-दोन असे तीन पाळीत सहा सुरक्षा रक्षक असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र धरणाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक त्याठिकाणी नेमला नसल्याचे दिसत आहे. आठवड्यातून एखाद दिवस एखादा सुरक्षा रक्षक पाठवून खोटी बिले काढून ठेकेदार महापालिकेची फसवणुक करीत असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. पाणी चोरणारा दादा सत्ताधारी वसई विकास आघाडीशी संबंधित असल्यानेच त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरीक करीत आहेत.
या चोर दादाला कुणाचे पाठबळ
धरणाच्या कॅचमेट भागात काही स्थानिक लोकांच्या जमिनी आहेत. त्याठिकाणी एका दादाने बोअररिंग मारून पाणी विकण्याचा सपाटा लावला आहे. पाणी उपशासाठी महावितरणकडून वीज ही घेण्यात आलेले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे धरणाला लागूनच महापालिकेचे तरणतलाव आणि गोडाऊन आहे. त्याठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. तरीही धरणाच्या पात्रातून पलिकडे जाऊन टँकर पाणी घेऊन विकायला जात असतात. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.