भाताचे पैसे दोन महिने रखडले
By admin | Published: February 8, 2016 02:28 AM2016-02-08T02:28:33+5:302016-02-08T02:28:33+5:30
वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
वाडा : वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. या मुळे शेतकऱ्यात महामंडळा विरूध्द प्रचंड संताप आहे.
महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगांव , खैरे आंबिवली या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रावरील अनेक बाबींबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तरीही शेतकरी आर्थिक अडचणीमुळे दुरदुरून भात विक्रीसाठी केंद्रावर आणतात. मात्र भात विक्रीनंतर लगेच शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत असे डाकिवली येथील शेतकरी चंद्रकांत पाटील या शेतकऱ्यांने सांगितले. दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे दिलेले नाहीत. पैशासाठी चौकशा व अनेक खेटे शेतकऱ्यांना मारावे लागतात. या महामंडळाच्या अनागोंदी कारभारा विरोधात शेतकऱ्यांत प्रचंड संताप आहे.
या बाबत सहकारी बँकेत चौकशी केली असता असे समजले की, आदिवासी महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांनी शेतकऱ्यांसाठी आलेल्या पैशाची हुंडी पांच दिवसाच्या आत बँकेतून वटविली पाहीजे. पाच दिवसापेक्षा जास्त दिवस न वटविता ठेवली तर त्यावर दंड आकारला जातो. व दंडाची रक्कम भरल्यानंतरच बँक पुढील हुंडी पास करते. अशी दंडाची लाखो रूपयाची रक्कम बँकेत भरलेली नसल्याने बँकेला हुंडी तास करण्यात अडचण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महामंडळ व सहकारी सोसायट्यात सदरचा दंड भरण्याबाबत तू तू मै मै सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मरण झाले आहे.महामंडळाच्या मोखाडा उपप्रादेशिक कार्यालयाकडून या दंड व्याजाची रक्कम नाशिक येथून मागवून ती बँकेत अदा करणे जरूरीचे होते.मात्र ही बाब अजून झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. असे बँकेकडून समजलेआठ दिवसात शेतकऱ्यांना भात विक्रीचे पैसे मिळाळे नाहीत तर शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.