पालघर : आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा सोमवारी केली जाईल, असे छातीठोकपणे रविवारी सांगणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पहले आप, पहले आप असा सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी कुठल्याच पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही. दुस-याचा उमेदवार पाहून आपला उमेदवार घोषित करायचे धोरण स्वीकारल्याने सोमवारचा दिवस तसा निरस ठरला.२२-पालघर (अज) लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ४ जणांनी एकूण ६ अर्ज घेतले. चौथ्या दिवसा अखेरपर्यंत एकूण २३ जणांनी ४४ अर्ज घेतले आहेत.मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी दिली. नामनिर्देशनपत्र १० मेपर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी पालघर लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे दाखल करता येणार आहेत.सोमवारी यांनी घेतले अर्ज : सुरेंद्र अशोक वझरे (१ अर्ज, भारतीय जनता पक्ष); नामदेव गायकवाड (२ अर्ज, समता सेना); प्रमोद शंकर बाडगे (२ अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस); सुरेश आत्माराम रेंजड (१ अर्ज, अपक्ष)
पालघर लोकसभा पोटनिवडणूक : सर्वच पक्षांचे वेट अॅण्ड वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:29 AM