पालीत बविआ, सत्पाळ्यात ग्रामसमृद्धी पॅनेलने जिंकल्या ११ पैकी ९ जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 10:06 AM2021-01-19T10:06:36+5:302021-01-19T10:06:56+5:30
कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते.
पारोळ : वसई तालुक्यात सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसमृद्धी पॅनेलने ११ जागांपैकी ९ जागा जिंकत बाजी मारली असून, यामध्ये बहुजन विकास आघाडीला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर पालीत मात्र बहुजन विकास आघाडीची सरशी झाली असून ४ पैकी ३ जागा मिळवल्या आहेत, तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. पालीमध्ये बिनविरोध झालेल्या ३ जागा बविआच्या असल्याने व निवडणुकीत ३ जागांवर विजय संपादन केल्याने ७ जागांपैकी ६ जागा आपल्याकडे घेत बविआने आपली सत्ता आणली आहे.
कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. सत्पाळ्यात ११ जागांसाठी तर पाली ७ जागांसाठी या निवडणुकीचा कार्यक्रम लावण्यात आला. पण पालीमध्ये ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी ४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. १५ जानेवारीला कोरोनाचे नियम अटी पाळत मतदान घेण्यात आले. सत्पाळामध्ये ७९ टक्के तर पालीत ८३ टक्के मतदान झाले होते. तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निकालात सोमवारी दुपारी विजयाचे चित्र स्पष्ट झाले.