वसई : ड्रायव्हरच्या संगनमताने मुंबई -अहमदाबाद हायवे वर ट्रकची लूटमार करणाऱ्या टोळीतील दोघांना वालीव पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण तक्रारदार असल्याचे उजेडात आले आहे. टोळीतील अन्य पाच जणांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.बेंगळुरूरहून ६८ लाख १० हजार रुपयांची २० टन सुपारी घेऊन आशापुरा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक रामबाबू हरिलाल यादव (४५) गुजरातकडे निघाला होता. ९ मार्चच्या रात्री साडेनऊ वाजता ट्रक पेल्हार हद्दीत आला असता मागून आलेल्या गाडीतील चार जणांनी तो अडवला. त्यानंतर भांडण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर निर्जन रस्त्यावर सोडून चोरटे ट्रक घेऊन पसार झाल्याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात नोंदविली होती. तपासात तो खोटे बोलत असल्याचे लक्षात येताच त्याला पोलीसी हिसका दाखवण्यात आला. त्यानंतर त्याने या लुटमारीत सहभागी असल्याची व ही टोळी विविध महामार्गावर ड्रायव्हरच्या संगनमतानेच ट्रकची लूटमार करीत असल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्या एका साथीदाराला अटक केली. व सुपारीने भरलेला ट्रकही हस्तगत केला. टोळीतील पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
तक्रारदार चालकच निघाला दरोडेखोर
By admin | Published: March 28, 2017 3:32 AM