अर्नाळ्यातील महात्मा गांधी स्मारकाची दुर्दशा
By admin | Published: May 28, 2017 02:57 AM2017-05-28T02:57:51+5:302017-05-28T02:57:51+5:30
अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात.
- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात. बेवारस कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. तर साफसफाई होत नसल्याने चोहोबाजूंला घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
राष्ट्र्पिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थींचे ८ जानेवारी १९४८ रोजी अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले होते. त्याची आठवण कायम रहावी यासाठी त्याठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले होते. मात्र, त्याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाल्याने त्याचे पावित्र्यच धोक्यात आले आहे.
गांधी स्मारकाच्या वास्तूची निगा राखण्यासाठी कायमस्वरुपी रखवालदार नाही. त्यामुळे याठिकाणी दारुडे खुलेआम दारु पित बसलेले असतात. स्मारकाच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे फेकलेली आढळून येतात. भिकारी, गर्दुल्ले यांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. भटक्या कुत्र्यांनी तर स्मारक आपले निवासस्थान बनवले आहे. नियमित सफाई केली जात नसल्याने केरकचरा साचलेला दिसून येतो. मात्र, स्मारकाची कुणीच निगा राखत नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
मध्यंतरी याठिकाणी चोहोबाजूंनी झाडावेलांनी वेढले होते. त्यावर मिडीयातून आवाज उठवल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला होता. त्यावेळी अनेक पुढारी आणि पक्षांनी स्वच्छता राखण्याच्या वल्गना केल्या होत्या. पण, दोन वर्षांनंतर स्मारक पुन्हा एकदा अपेक्षिताचे जिणे जगू लागले आहे.
गांधी जयंतीच्या दिवशी याठिकाणी स्वच्छता केली जाते. त्यानंतर मात्र याठिकाणी कुणी फिरकतदेखिल नाही. महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जनानंतर या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मारकाचे पावित्र्य जपण्यात यावे. याठिकाणी कायमस्वरुपी रखवालदार नेमण्यात यावा. स्मारक परिसराची नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कराळे यांनी दिला आहे.