नाताळ व कोरोनाच्या निमित्ताने सर्वधर्म मैत्रीला पोप फ्रान्सिस यांची विश्व बंधुत्वाची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 07:46 PM2020-12-25T19:46:01+5:302020-12-25T20:43:06+5:30
आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो : वसई धर्मप्रांतात बिशप हाऊसच्या वतीनं सर्वधर्म मैत्री प्रार्थना मेळावा संपन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : जगावर आलेलं कोरोनाचे संकट ओढवलेलं असताना त्यात नाताळ निमित्ताने सर्वधर्म मैत्रीला रोम वरून पोप फ्रान्सिस यांनी विश्व बंधुत्वाची हाक दिली असल्याचं आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांनी सांगितले.
कोविड -19 या विषाणूचे जीवघेणे सावट अध्याप दूर झालेले नसून राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कोविड -19 संदर्भात सर्व अटीं नियमांचे काटेकोरपणे पालन करत वसई धर्मप्रांतामध्ये नाताळ सर्वधर्म मैत्री सण शुक्रवारी संध्याकाळी वसईच्या बिशप हाऊसच्या वतीनं गिरीज स्थित जीवन दर्शन केंद्रा मध्ये आर्च बिशप डॉ .फेलिक्स मच्याडो यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी बिशप यांच्या सोबत निवडक फादर्स काही स्वयंसेवकांच्या मदतीने मार्गदर्शक तत्वे व सूचना चे काटेकोरपणे पालन करत लोकांना त्यांची ख्रिस्ती श्रद्धा पाळण्यासाठी व नाताळ सण साजरा करण्यास मदत, व दुस-या बाजूला त्यांचे कोविड – 19 विषाणूपासून पूर्ण संरक्षण अशी दुहेरी खबरदारी घेत हा मैत्री मेळावा भावगीत व प्रार्थना करत संपन्न झाला
दरवर्षी प्रमाणे नाताळसणाचे औचित्य साधून, सर्व धर्म मैत्री प्रार्थना मेळावा बिशप हाऊस मध्ये साजरा होतो मात्र यावेळी कोविड मुळे अगदी निवडक अशा 25 व्यक्तींसह जीवन दर्शन केंद्र, गिरिज येथे शुक्रवारी नाताळ संध्येला संपन्न झाला.
सदर प्रार्थना मेळाव्यास वसईचे माजी आमदार डॉमिनिक घोन्सालवीस, विविध धर्माचे नेते, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीं आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो ह्यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित होते.
या कार्यक्रमात नाताळ गीतानंतर प्रार्थना, दीप प्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरवात झाली.
कोरोंना महामारी पासून संपूर्ण जगाचे संरक्षण व्हावे, जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करत उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत नाताळ निमित्ताने पोप फ्रान्सिस यांचा ही शुभ संदेश वसईकरांना दिला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.