नालासोपारा : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर नोकरदारांना बुधवारपासून एसटी बसमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे शेकडो प्रवाशांचा नालासोपारा रेल्वेस्थानकात सकाळी ८ वा.च्या सुमारास उद्रेक झाला. मुंबईहून विरारकडे जाणारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीची लोकल अडवून आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवासी करत होते. या आंदोलनामुळे ही लोकल अडीच तास खोळंबली होती. प्रवाशांना रेल्वेरुळांतून हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला पोलिसांना पाचारण करावे लागले.
कोरोनामुळे चार महिने घरामध्ये थांबावे लागल्याने परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न पडलेल्या प्रवाशांचा संयम सुटला. इतर प्रवाशांना एसटीने प्रवास करण्यास नकार दिल्यामुळे प्रथम एसटी डेपोमध्ये प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर, रेल्वेचे संरक्षक पत्रे तोडून शेकडो प्रवाशांनी रेल्वे फलाटावर प्रवेश करून रुळांवरच ठिय्या दिला.
रेल रोको करणाºया १२५-१५० प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रवाशांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केलेला नाही. त्यांची समजूत काढून घरी पाठवण्यात आले.- यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस, वसई