नालासोपारा : वसई तालुक्यात कोरोना प्रादुर्भावाचा सर्वात जास्त धोका पोलीस विभागाला निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वालीव पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रॅपिड कोरोना तपासणी करण्यात आली. मागील पाच महिन्यांपासून कोणतीही सुट्टी न घेता पोलीस १२ तास कर्तव्य बजावत आहेत. यादरम्यान पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे. पोलिसांमध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वरिष्ठ अधिकारी चिंतीत होते. त्यातच तिन्ही मृत्यू झालेले पोलीस वालीव पोलीस ठाण्यातच कार्यरत होते.
वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वसई पूर्वेकडील वालीव गावातील ज्ञानदीप शाळेत वालीव पोलिसांची रॅपिड कोरोना तपासणी शुक्रवारी केली. सुमारे १३० पोलिसांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. या तपासणीत दोन पोलिसांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.महानगरपालिकेच्या डॉ. राजेश चौहान, डॉ. विनय चाळके आणि त्यांच्या टीमने ही तपासणी केली आहे. या तपासणीदरम्यान तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यांची तपासणी बाकी आहे किंवा गुन्ह्याच्या तपासासाठी जे पोलीस बाहेर आहेत, त्यांचीही लवकरच कोरोना रॅपिड टेस्ट घेणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांतील अंदाजे ९० पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनाबाधित झालेल्यांपैकी ८० टक्के पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा कामावर रुजू झाले आहे. तर, दोन पोलीस कर्मचारी आणि एका पोलीस अधिकाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस दलामध्ये भीती पसरलेली आहे.