वसई : वसई-विरार शहरात काेरोना बाधितांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा पुरेसा साठा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. मागणी व पुरवठा यातील तफावतीमुळे ही महत्त्वाची इंजेक्शन शहरातील रुग्णालयांना मिळाली नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची दोन-तीन दिवसांपासून पळापळ सुरूच होती. तर हा साठा उपलब्ध न झाल्याने अन्न व औषध प्रशासनासह (एफडीए) जिल्हाधिकारी व महापालिका आरोग्य विभाग कार्यालयातील अधिकारी हतबल झाले आहेत.गेल्या आठवडाभरापासून शहरात प्राणवायू व ‘रेमडेसिविर’चा तुटवडा भासू लागला आहे. केमिस्ट संघटनेच्या इंजेक्शन विक्री दरम्यान झालेली गर्दी, गोंधळ आणि सुरक्षित वावराच्या नियमांचा उडालेला फज्जा यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने इंजेक्शनची किरकोळ विक्रीच बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण व वसई-विरार शहरात इंजेक्शनचा तुटवडा भरून काढण्यात ‘एफडीए’ला पुरेसे यश येऊ शकले नाही.जिल्हा प्रशासनाने ‘एफडीए’ च्या माध्यमातून तक्रार नियंत्रण कक्ष सुरू तर केले, मात्र तेथेही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्याच असंख्य तक्रारी असून रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.
तक्रारी वाढल्याकोरोनाच्या रुग्णांना प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शन लागते. मात्र वसई शहरातील रेमडेसिविरच्या साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. त्यांच्या धोरणानुसार रुग्णालयांना इंजेक्शनचा साठा थेट पाठवला जात आहे. मात्र, छोट्या रुग्णालयांत दाखल केलेल्या रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.