वसई : गिरीज येथे पेव्हर ब्लॉक रस्ता पूर्ण करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार उजेडात आला असून आयुक्तांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.बिलकाई देवी मंदिर ते मुख्य रस्त्यापर्यंत पेव्हर ब्लॉक पुरवणे व बसवणे या कामाचा ठेका मे २०१६ मध्ये देण्यात आला होता. दीड वर्षे झाल्यानंतरही याठिकाणी पेव्हर ब्लॉक न बसवण्यात आल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अतुल पाटील यांनी महापालिकेकडे विचारणा केली. त्यावेळी रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. रस्ता पूर्ण झाल्याचे उत्तर दिल्यानंतर पाटील यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली असता आणखी धक्कादायक बाब उजेडात आली. ३० जून २०१७ ला रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर तज्ञांकडून कॉम्प्रसिव्ह स्ट्रेंथ तपासण्यात आली आहे. कामाचे मोजमाप करण्यात आले आहे. काम योग्यरित्या करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सहाय्यक अभियंत्यांनी दिले आहे. त्यानंतर ठेकेदाराला कामाची पूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेने माहिती अधिकारात पाटील यांना दिली आहे. कागदोपत्री असलेल्या रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी केली होती.
रस्ता कागदावरच, लाखो रु. खिशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:35 AM