वसई/पारोळ : वसई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच निवडणुक १७ जुलै ते २५ जुलै या दरम्यान होणार असल्यामुळे तीन महिन्यापासून थंड असलेले गावपातळीवरील राजकारण पुन्हा तापणार आहे.वसई तालुक्यात १७ एप्रिल रोजी ११ ग्रामपंचातीमध्ये निवडणुक घेण्यात आली होती. तसेच १८ एप्रिल रोजी निकाल ही जाहीर झाला होत. पण सर्व ग्रामपंचायतींच्या आधीच्या सदस्याचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत असल्याने नवीन सदस्यांच्या गळ््यात सरपंच/उपसरपंच पदाची माळ गळयात पडण्यासाठी तीन महिने वाट पहावी लागली. या काळादरम्यान अनेक गावांमध्ये निवडणुकीवरून वाद विवाद झाले. खानिवडे येथे झालेल्या वादात तर काही व्यक्तींवर गुन्हे ही नोंदवले गेले. आता पुन्हा एकदा सरपंच व उपसरपंचपदासाठी होणारी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.१७ ते २५ जुलै या दरम्यान होणाऱ्या सरपंच निवडणुका अशा असतील १७ जुलै खानिवडे,शिरवले, १८ जुलै आडणे, मोठे वडघर, सकवार, शिवणसई, पोमण, व उसगाव, १९ जुलै भाताणे व माजीवली, तसेच २५ जुलै रोजी चंद्रपाडा या ठिकाणी सरपंच/उपसरपंच निवडणुक होणार आहे. वसईत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वात जास्त बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. शिरवली, खानिवडे,भाताणे,आडणे, शिवणसई, उसगाव, मेठे वडघर या ग्रामपंचायती मध्ये बहुजन विकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे.तर चंद्रपाडा शिवसेना, सकवार भाजपा, श्रमजिवी, बहुजन विकास आघाडी त्रिशंकू, तर माजीवली मध्येही त्रिशंकूच परिस्थिती आहे. वसई तालुक्यात, सकवार, माजीवली या गावात सरपंच व उपसरपंच निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
सरपंच, उपसरपंच निवडणुका जाहीर
By admin | Published: July 14, 2016 1:36 AM