विक्रमगड : अनेकदा मागणी करुन सार्वनिक बांधकाम विभागाने विक्रमगड जव्हार या महामार्गावर संरक्षण कठडे आणि दरीच्या ठिकाणी साईड पत्रे लावले असले तरी अशा वळणांवर किंवा दरीच्या जागी सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. या कारभारामुळे पावसाळ्यात मोठे अपघात घडू शकतात. जांभाजा पळूच्या वळणावर दरी असून या ठिकाणी संरक्षक कठडा नसल्याने वाहनांसाठी ते धोकादायक बनले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक कार कोसळली आहे. या शिवाय साखरे गावाच्या वळणावर सुद्धा संरक्षक पत्र्याची आवश्यकता होती. उंबरवांगच्या मागे मोरी असून या ठिकाणी संरक्षक कठडा आवश्यक होता. काशिवली गावाच्या पुढे वळणावर संरक्षक कठडा किंवा पत्र्यांची आवश्यकता होती. विक्रमगड-जव्हार या दोन्ही शहरामध्ये २५ कि.मी. चा घाट असून वळण्याच्या ठिकाणी किंवा खोल दरीसारख्या भागावर संरक्षक कठडा किंवा खोल खांब लावण्याची मागणी अनेक दिवसापासून होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून घाट वळणात व खोल दरीच्या ठिकणी साईड पत्रा संरक्षणसाठी लावण्यात आला आहे. परंतु हे संरक्षण खांब व पत्रा अनेक ठिकाणी लावण्यात आलेले नसून या मार्गावर अद्यापही अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एस.ससाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. विक्रमगड-जव्हार मुख्य रस्ता असून या घाटात अनेक अपघात झाले आहेत . शिवाय जव्हार हे पर्यटन क्षेत्र असल्याने वाहनाची संख्याही जास्त आहे. पावसाळ्यात हौशी प्रवासी तर हिवाळ्यात शैक्षणिक सहली याच मार्गावरुन प्रवास करतात. तरी याबाबत विभागातील कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देवून अजूनही ज्या भागात आवश्यकता आहे त्या भागात सरंक्षक खांब लावण्याची मागणी वाहन चालकानी केली आहे. (वार्ताहर)
घाट रस्त्याची सुरक्षा अर्धवट
By admin | Published: July 16, 2016 1:38 AM