वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात २८३ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:55 PM2020-07-23T23:55:15+5:302020-07-23T23:55:20+5:30
नालासोपारामधील ९७ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवले
वसई/नालासोपारा : वसई-विरार महापालिका परिसरामध्ये गुरुवारी सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी दिवसभरात २८३ नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या १० हजार ६०६ वर पोहोचली आहे. तर १२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, ९७ वर्षीय आजोबा कोरोनाला हरवून घरी परतल्याने नातेवाइकांनी आनंद व्यक्त केला आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत गुरुवारी २८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
धक्कादायक म्हणजे दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर पालिका हद्दीत एकूण २१९ रुग्ण मयत झाले असल्याने ही बाब चिंतेची ठरली आहे. दरम्यान, शहरात १२९ रुग्ण घरी परतले असून आजवर मुक्त रुग्णांची संख्या ६ हजार ९७२ वर पोहचली आहे. तर शहरात एकूण ३ हजार ४१५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
दरम्यान, कोरोनाला न घाबरता त्यावर वेळीच उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येते हेही सिद्ध झाले आहे. केवळ तरुणांनीच नाही तर अनेक वृद्धांनीदेखील कोरोनावर विजय मिळविला आहे. नालासोपाऱ्यातील एका ९७ वर्षीय आजोबांनी अवघ्या आठ दिवसातच कोरोनाला हरविले आहे. स्टार हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिका यांनी आजोबांना टाळ्या वाजवून घरी सोडले आहे.
नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव येथील माजी नगरसेवक वैभव पाटील यांचे आजोबा रामचंद्र कृष्णा पाटील (९७) यांना कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व अशक्तपणा आल्याने त्यांना स्टार रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर पाटील कुटुंबियांना क्वॉरंटाईन केले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले.
कोरोनासारख्या आजाराला चांगला प्रतिसाद देत रामचंद्र पाटील यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या जिद्दीला सलाम केला. वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, त्यात मृत्यूच्या आकड्यात वाढ होत असताना ९७ वर्षीय आजोबांनी कोरोनावर केलेली मात दिलासा देणारी आहे.