विक्रमगड : उन्हाळा आणि तहान याचे महत्व मार्च महिन्यातील झळा लागल्या की, आपसूकच जाणवू लागते. आधुनिक काळामध्ये बऱ्याच ठिकाणी सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे घरोघरी फ्रिज दिसत असला तरी विक्रमगडच्या कुंभारवाड्यात माठांसाठी अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. त्यातच बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होत असल्याने डॉक्टरांकडून फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातले गार पाणी प्या असा असा सल्ला देत असल्याने माठ इन व्हेरी मच डिमांड आहेत.येथील कुंभांरवाडयात डिसेंबरपासूनच माठांची निर्मिती सुरु होते़ गुजरात येथून लागणारी माती आणली जाते़ त्यानंतर तिच्यावर प्रक्रिया केली जाते़ गुळगुळीत माठांबरोबरच डिझाईचे माठ ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे विक्रमगडचे कुंभार बळवंत प्रजापती आवर्जून सांगतात. त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही हाच व्यवसाय स्वीकारला असून सिझनच्या काळात चांगला व्यवसाय होत असल्याचे ते सांगतात. वर्षभर सण व मागणीनुसार त्यांची कामे सुरु असतात़ पूर्वी कुंभारवाडयातच माठ बनविले जायचे़ परंतु भट्टीसाठी पुरेशी जागा नसल्याने गेल्या काही वर्षापासून माठ बनविण्याचे काम कमी झाल्याचे विकी प्रजापती यांनी सांगीतले़ माठात सुद्धा राजस्थानी माठ व आपल्या कोकणात तयार होणारे मराठमोळा माठ असा फरक असतो. मात्र हल्ली विक्रमगड, जव्हार, वाडा आदिभागामध्ये पूर्वीसारख्या मातीच्या खाणी नसल्याने ट्रेंड बदलत गेला आहे. कुंभारवाड्यातही सर्वच कुटुंबे आता या व्यवसायात नाहीत. अनेकांनी पूरक व्यवसाय निवडल्याने मागणी वाढली व पुरवठा मंदावला अशी स्थिती आहे.(वार्ताहर)
माठाचे महत्व मॉडर्न जमान्यातही कायम
By admin | Published: March 28, 2017 5:04 AM