जव्हार : आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेत सडक्या व कुजक्या सफरचंद व केळींचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा असा चार तालुक्याचा समावेश असून. जव्हार प्रकल्पाअंतर्गत ३० निवासी आश्रम शाळा आहेत. या शाळेत १७ हजार ३०० विद्यार्थी निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. आदिवासी विभाग अप्पर आयुक्त ठाणे यांच्या आदेशाने, आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळांत करण्यात येणारा सफरचंद व केळींचा पुरवठा अचानक बंद करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करीत शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी चालविली होती. याबाबत वृत्तेही प्रसिद्ध झाली होती.याची दखल घेत आदिवासी विकास विभागाने जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांना सफरचंदे व केळींचा पुरवठा चालू करण्यात आला खरा, मात्र ती सडकी आणि कुचकी असल्याचे आढळून आले. त्यामुळे मोखाडा व जव्हार तालुक्यातील नांदगाव, हिरवे, चास, गोंदे, विनवळ, वांगणी, देहरे, झाप, साकूर, या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी ती खाल्यास आमचे आरोग्य धोक्यात येईल असे सांगून खाण्यास नकार दिला. सडके व कुजके व खराब फळ कुठल्याही परिस्थितीत उतरवून घेवू नये अशा सूचना मुख्याध्यापक व अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत.-किरण माळी, प्रकल्प अधिकारी, जव्हार
विद्यार्थ्यांना सडकी सफरचंदे अन केळी
By admin | Published: October 25, 2016 3:36 AM