हवालदार आत्महत्येप्रकरणी आदिवासी विकास परिषदेची ‘चलाे पालघर’ची हाक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:07 AM2020-12-26T00:07:56+5:302020-12-26T00:11:46+5:30
Vasai : आदिवासी समाजातील असलेल्या भाेये यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुळिंज पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदाेष मनुष्यवध, रॅगिंग ॲक्ट आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावा, या मागणीसाठी हा माेर्चा काढण्यात येणार आहे.
वसई : तुळिंज पाेलीस ठाण्यामध्ये वरिष्ठांच्या छळवणुकीला कंटाळून पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या दालनात गुरुवारी वाघेरपाडा ठाणापाडा येथील रहिवासी पाेलीस हवालदार सखाराम भाेये यांनी आत्महत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाेलीस अधीक्षक कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आदिवासींना माेठ्या संख्येने सहभागी हाेण्याचे आवाहन परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केले आहे.
आदिवासी समाजातील असलेल्या भाेये यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुळिंज पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदाेष मनुष्यवध, रॅगिंग ॲक्ट आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावा, या मागणीसाठी हा माेर्चा काढण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना जाब विचारला जाणार आहे.
या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे,
तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील सर्व संघटना, पदाधिकाऱ्यांनी आपले पोलीस ठाणे व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्याचे आवाहन जाधव यांनी
केले आहे.
सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करा : सुनील भुसारा
-डहाणूचे आमदार सुनील भुसारा यांनी आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ ३ च्या तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि इतर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच भोये यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी न्याय देण्याची मागणी केली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पाेलीस आयुक्त डाॅ. सदानंद दाते म्हणाले, या
घटनेनंतर मी तत्काळ घटनास्थळी पाेहाेचलाे. यासंदर्भात नेमके काय घडले आणि या घटनेची पार्श्वभूमी काय होती, याबाबत परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त चाैकशी करीत आहेत. चौकशीत सत्य समोर येईल. त्यानंतर दोषींवर नक्कीच कारवाई होईल.