हितेन नाईक, पालघरतालुक्यात शिक्षणाच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण झाल्या असून गट शिक्षणाधिकाऱ्यानी शिक्षकांच्या परस्पर नेमणुका केल्या आहेत. यावेळी शिक्षकांचे व्यवस्थित समायोजन करण्यात न आल्याने अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून पालकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गटशिक्षण अधिकाऱ्याकडे असलेल्या अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेऊन त्यांच्या कडे पूर्णवेळ कारभार सोपविण्यात यावा अशी मागणी पंचायत समिती चे सभापती रवींद्र पागधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कडे केली आहे. पालघर पंचायत समिती मागे अनेक वर्षापासून शिक्षणाच्या बदल्या प्रकरणात बदनाम असून शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर पैसे घेऊन करणे, आपापल्या जातबांधव शिक्षकांना सोयीच्या ठिकाणच्या शाळा देणे, प्रतिनियुक्तीच्या गोंडस नावा खाली घोळ घालणे, समायोजन न करणे, खोटी पटसंख्या दाखिवणे, आदिवासी विकास घटक योजना भागातून एकस्तर आणि प्रोत्साहन भत्ता लाटता यावा यासाठी मोक्याच्या शाळा बळकाविणे इत्यादी बेकायदेशीर कामे काही माजी गटशिक्षणाधिकारी, गटविकासअधिकारी व सभापती, आमदार यांच्या संगनमताने केली जात होती. या प्रकरणात अनेक प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलंबित होऊन गटविकास अधिकारी कार्यालयीन चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे पालघर पंचायत समिती आवार म्हणजे शिक्षक बदलीचा अड्डा बनल्याचा संतप्त प्रतिक्रिया शिक्षका अभावी बंद पडत चाललेल्या शाळातील मुलांच्या पालकांकडून ऐकायला मिळत आहेत.गटशिक्षणाधिकारी चौधरी यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या पालघर उपशिक्षणाधिकारी पदाचाही कार्यभार असल्याने तालुक्यातील ४५० शाळांचे प्रलंबित अनेक प्रश्नाचे निराकरण होत नाही. त्यामुळे चौधरी यांच्याकडे असलेला उपशिक्षणाधिकारी पदाचा कारभार काढून त्यांना फक्त पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी पदाचे कामकाज बघण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही सभापती पागधरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
वशिलेबाजीमुळे अनेक शाळा बंद
By admin | Published: July 15, 2016 1:19 AM