ग्रामीण भागात विनामास्क एसटी प्रवासी वाहतूक; ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:03 AM2021-02-24T00:03:47+5:302021-02-24T00:03:55+5:30
‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली
खोडाळा : प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे चांगले सहकार्य यामुळे कोविड-१९चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी झाला होता. तथापि, कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र, मास्क वापरणे बंधनकारकच होते. ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हे शासनाचे धोरण असले तरी सार्वजनिक ठिकाणी तथा प्रवासात त्याचा काटेकोर अवलंब होताना दिसत नसल्याने जनतेची बेफिकिरी दिसून येत आहे.
कोविड-१९चे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. मोखाडा तालुक्यात आणि प्रामुख्याने खोडाळा बाजारपेठेत रुग्ण दगावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मास्कचा नियमित वापर हाच सध्या तरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मास्कचे महत्त्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ मोहीम प्रभावी रीतीने राबविण्यात येत आहे. परंतु त्याबाबत लोक दुर्लक्ष करीत आहेत.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला मास्क वापराचे महत्त्व पटवून देणे तसेच कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा, मास्कचा वापर कशा पद्धतीने करावा तसेच त्याची विल्हेवाट कशा रीतीने लावावी याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. असे असले तरीही प्रवासी, व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे स्थानिक व तालुका प्रशासनाने त्यावर खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज आहे.